इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजबांधवांच्या विकासकामांसाठी व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी देखील भरघोस निधी दिला आहे. राज्य सरकारच्या वतीने आम्ही निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर शहरातील दोन्ही ईदगाह मैदानावर शनिवारी (दि. 21) मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, नगराध्यक्ष भरत शहा, उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महारुद्र पाटील आदींसह नगरसेवक, विविध पक्षांच्या मान्यवरांनी सहभागी होत मुस्लिम समाजबांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देताना मंत्री भरणे बोलत होते.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, यंदा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने अत्यंत साध्या पद्धतीने ईद साजरी करण्याचा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला असून, आपण सर्व जण अद्याप ही
दुःखातून सावरलो नाहीत. तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव हे नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. विकासकामांच्या बाबतीत देखील यापुढेही तालुक्यात निधी कमी पडू देणार नाही.
या वेळी शहरासह तालुक्यातील छोट्या-मोठ्या गावातील मुस्लिम बांधव इंदापुरातील दोन्ही ईदगाह मैदानांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात अनेक ठिकाणी रमजान ईदनिमित्त शिरखुर्मा पार्टी ठेवण्यात आली होती. त्याला देखील अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला.