पुणे: काश्मीर पहलगाम येथील बैसरान खोर्यात झालेल्या हल्ल्यानंतर रेल्वे प्रशासनही अलर्ट झाले असून, आता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे रेल्वे स्थानकासह विभागातील सर्वच स्थानकांवरील सुरक्षितेत आता वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर आता शस्त्रधारी रेल्वे सुरक्षा जवानांसह (आरपीएफ) डॉग स्क्वॉडचीही 24 तास गस्त ठेवण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर देशातील अनेक भागांत हल्ला होण्याची शक्यता आहे. अनेक भडकावू व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर आता अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.
हे टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी सुरक्षा जवानांसह डॉग स्कॉडची 24 तास गस्त ठेवण्यात आली आहे. डॉग स्क्वॉडद्वारे प्रवाशांच्या सामानासह रेल्वे गाड्यांची तपासणी केली जात आहे. तर शस्त्रधारी जवान स्थानकावर आणि प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. संशयास्पद कोणी आढळल्यास त्याची कसून चौकशी केली जात आहे.
स्थानकांवर सुरक्षेसंदर्भातील व्यवस्था..
पुणे स्थानकावर संध्याकाळी अतिरिक्त निरीक्षकाची (आरपीएफ इन्स्पेक्टर) नियुक्ती.
वरिष्ठ अधिकारी स्थानकाला सरप्राईज व्हिजिट देऊन करणार तपासणी.
सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे सातत्याने बारकाईने लक्ष.
जीआरपी अधिकार्यांसोबत समन्वय बैठकांचे आयोजन.
डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी.
कर्तव्य अधिकारी आणि सर्क्युलेटिंग एरियामध्ये तैनात कर्मचार्यांना शस्त्रासह ड्युटीच्या सूचना.
स्थानक परिसरात अतिरिक्त चेकिंग व गस्तमध्ये वाढ.
कर्मचार्यांना सूचना मिळताच, तत्काळ स्थानकावर हजर राहण्याचे आदेश.
प्रत्येकी 30 खाटांच्या दोन बॅरक्स ताडीवाला रोड येथे तयार.
जवळ राहणार्या कर्मचार्यांच्या यादीची ’डीएससीआर’ पुणे येथे उपलब्धता.
त्वरित माहिती प्रसारित करण्यासाठी एक आपत्कालीन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार.
एक अधिकारी व दोन कर्मचार्यांच्या सशस्त्र पथकाची प्रत्येक शिफ्टमध्ये गस्त.
पुणे विभागातील 24 महत्त्वाच्या गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था.
रात्रीच्या वेळी एका निरीक्षकाची ड्युटी स्टेशन कंट्रोल रूमशी नियमित समन्वय.
स्थानक व गाड्यांमध्ये सिव्हिल ड्रेसमधील विशेष पथके तैनात.
’रेल मदत’ प्लॅटफॉर्मवर प्राप्त होणार्या तक्रारींची देखरेख.
गुप्तचर विभागाकडील माहिती संकलनासाठी आरपीएफचा एसआयबी युनिटसोबत समन्वय.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे आम्हाला वरिष्ठ पातळीवरून प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे आम्ही पुणे रेल्वे स्थानकासह विभागातील सर्वच स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. शस्त्रधारी जवानांसह डॉग स्क्वॉड तैनात करण्यात आले आहेत. त्याद्वारे कडक तपासणी केली जात आहे.- प्रियांका शर्मा, वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, पुणे विभाग