प्रसाद जगताप
पुणे: शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. साहजिकच मुलांसह पालक थंड ठिकाणे, सागरी किनारे अशा ठिकाणी पर्यटनाला पसंती देताना दिसत आहेत. साहजिकच एसटी, विमान, रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल झाल्या असून, पर्यटनस्थळे-सुद्धा गजबजल्याचे दिसत आहेत. सरकारी तथा खासगी रिसॉर्टसुद्धा पर्यटकांमुळे फुल्ल झाली आहेत.
साऊथ अमेरिका, युरोप, स्विर्त्झलंडला पर्यटन
पुण्यातून दुबई, बँकॉक आणि सिंगापूर या तीन देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे होत आहेत. या तीन ठिकाणी पर्यटनाला जाण्याकरिता पुणेकर पर्यटक पुणे विमानतळाला पसंती देत आहेत. तसेच इतर आंतरराष्ट्रीय विमानतळांमार्फत परदेशातील साऊथ अमेरिका, युरोप, स्विर्त्झलंड, इटली, अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया, केनिया, टांझानिया, बाकू, जॉर्जिया देशातदेखील पर्यटनासाठी जात आहेत. याशिवाय कमी बजेट असलेले पर्यटक फुकेत, भुतान, श्रीलंका, थायलंड येथेही जाण्यास पसंती देत आहेत.
देशांतर्गत हवाई प्रवासालाही पसंती
पुणे विमानतळावरून नुकतेच उन्हाळी वेळापत्रक जाहीर झाले आहे. दररोज येथून 208 विमानांची ये-जा होत आहे. त्याद्वारे दररोज 30 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास सुरू आहे. पुणेकर येथून जयपूर, लखनऊ, वाराणसी, कोलकाता, गोवा, बंगळुरू, दिल्ली, पंजाब, चंदिगढ, अमृतसर, चेन्नई, इंदोर, जम्मू, काश्मीर, लेह, लडाख अशा ठिकाणाला पर्यटक पसंती देत आहेत.
एमटीडीसीच्या रिसोर्टला प्रतिसाद
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील भीमाशंकर, कार्ला, पानशेत, सिंहगड रिसॉर्ट यांसह राज्यातील अजिंठा, फर्दापूर, वेलणेश्वर, ताडोबा, माळशेज, भंडारदरा, तारकार्ली, लोणार असे सर्वच एमटीडीसी रिसॉर्ट फुल्ल झाले आहेत.
या पर्यटनस्थळांवर वाढतेय गर्दी
शनिवारवाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, सारसबाग, पर्वती मंदिर व संग्रहालय, कात्रज सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय, केळकर संग्रहालय, कस्तुरबा पॅलेस व म्युझियम, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी गार्डन, खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत, वरसगाव धरण, निळकंठेश्वर, थेऊरचा गणपती, रामदरा, मुळशी धरण, पळसे धबधबा, कोळवडे मसोबा, लवासा सिटी, हाडशी साईबाबा मंदिर आदी.
पर्यटकाची राज्यासह देश आणि परदेशातील पर्यटन स्थळांना ते भेट देत आहेत. यात ज्याचे जेवढे बजेट तेवढे लांबचे पर्यटन केले जात आहे. विमान कंपन्या उन्हाळी सिझनमध्येच तिकिटांचे दर वाढवतात. या विमान कंपन्यांच्या तिकीट दर वाढीवर कोणाचाही अंकुश नाही. सिझनमध्ये होणारी तिकीट दरवाढ थांबवण्यासाठी त्यांच्यावर शासनाचा अंकुश असायला हवा.- नीलेश भन्साळी, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, पुणे
रिसॉर्टला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उन्हाळ्याच्या सिझनमध्ये आमच्याकडील सर्व रिसॉर्ट 90 टक्क्यांपेक्षा अधिक फुल्ल असतील, असा आमचा विश्वास आहे.- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)