पुणे

Pune News : पारितोषिकाची वाढीव रक्कम मान्यतेच्या ‘कचाट्यात’

अमृता चौगुले
पुणे : अनेक खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर भारताला पदके मिळवून देत असतात. अशा खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.  या पुरस्काराच्या निमित्ताने दिल्या जाणार्‍या पारितोषिकाच्या रकमेमध्ये वाढ केली असली, तरी अद्यापही खेळाडूंपर्यंत पोहोचलेली नाही. दरम्यान, क्रीडा विभागाच्या वतीने रकमेतील वाढीसंदर्भात प्रस्ताव देण्यात आला असून, अद्यापही मान्यतेच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दरवर्षी शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता, राज्य क्रीडा खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी प्रकारातील खेळाडूंचा सन्मान केला जात असतो.  यावर्षी राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.  या वितरणप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराची रक्कम तीन ऐवजी पाच लाख, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा गौरव पुरस्काराची रक्कम एक वरून तीन लाख
करण्यात आली. परंतु दीड महिन्यानंतरही संबंधित वाढीव रक्कम पुरस्कार विजेत्यांपर्यंत पोहोचलेली नाही.

शासनाकडे प्रस्ताव दाखल

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रकमेमध्ये वाढ झाली असून त्याबाबतचा वाढीव निधी क्रीडा विभागाकडे उपलब्ध आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. शासनाकडून मान्यता मिळताच त्वरीत खेळाडूंच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.
– सुधीर मोरे (सहसंचालक, 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय).

खात्यामध्ये रक्कम जमा करावी

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुरस्काराची रक्कम वाढवली असून ही वाढीव रक्कम लवकरात लवकर खेळाडू व खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, दीड महिन्यानंतरही खेळाडू या रकमेची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री, शासन तसेच क्रीडा विभागाने त्याबाबत त्वरीत हालचाली करून खेळाडूंना वाढीव रक्कम द्यावी.
– सागर गुल्हाने (महासचिव, 
युवा क्रीडा संघटना महाराष्ट्र)
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT