आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारी (दि. 8) झालेल्या लिलावात कांद्याच्या दरात वाढ झाली. कांद्याला प्रति 10 किलोस कमाल 211 रुपये भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
गेल्या काही आठवड्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी होत चालली आहे. एप्रिल व मे महिन्यांत सरासरी भाव कमी असल्याने अनेक शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला होता. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या जोरदार पावसामुळे कांदा खराब होऊ लागल्याने शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणण्यास सुरुवात केली. (Latest Pune News)
परिणामी, मागील 15 दिवसांपासून उपबाजारात कांद्याची चांगली आवक होत होती. कांद्याचे भाव मे अखेरीस 200 रुपये प्रति 10 किलो या स्तरावर पोहोचले होते. मात्र, नंतरच्या लिलावात काहीसा चढ-उतार झाला. रविवारच्या लिलावात मात्र कांद्याने पुन्हा 210 रुपयांचा उच्चांकी दर गाठला. त्यामुळे पुढील काही दिवसांत कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी एकूण 11 हजार 480 गोणी कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता, अशी माहिती सचिव रूपेश कवडे, कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली. कांद्याच्या वाढलेल्या दरामागे दक्षिण भारतातील मागणी हे महत्त्वाचे कारण असल्याचे स्थानिक व्यापारी संजय कुर्हाडे, विजय कुर्हाडे, अनिल गडगे, जीवन शिंदे, शिवप्रसाद गोळवा व ज्ञानेश्वर गाढवे यांनी सांगितले.
रविवारच्या लिलावातील कांद्याचे दर (प्रति 10 किलो)
एक्स्ट्रा गोळा : 190 ते 211, सुपर गोळा : 170 ते 190, सुपर मीडियम : 150 ते 170, गोल्टी/गोल्टा 130 ते 150, बदला/चिंगळी : 30 ते 100.