पुणे

पारगाव : कांद्याच्या बाजारभावात वाढ!

अमृता चौगुले

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: कांद्याला सध्या 10 किलोला 350 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव चांगला आहे. परंतु अतिपावसाचा फटका कांद्याला बसल्याने कांदा सडण्याचे प्रमाण हे खूपच वाढले आहे. त्यामुळे बाजारभाववाढीचा कांदा उत्पादकांना फायदा होत नसल्याचे दिसत आहे. एकंदरीत बघता काहीही झाले तरी शेतकऱ्यांना कोणताही लाभ होताना दिसत नसल्याची स्थिती आहे.

कांद्याचे बाजारभाव वाढत चालल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या बराकीत साठविलेला कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्याची लगबग सुरू आहे. सध्या 10 किलोला 350 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हंगामातील हा उच्चांकी बाजारभाव असल्याने शेतकर्‍यांनी कांदा बाजारपेठेत पाठवण्यासाठी लगबग सुरू केली आहे. परंतु कांद्याची प्रतवारी करताना निम्म्याहून अधिक कांदे सडलेले निघत असल्याने ते फेकून द्यावे लागत आहेत.

यंदा या परिसरात सरासरीपेक्षा खूपच अधिक पाऊस पडला. अनेक शेतकर्‍यांनी साठवलेल्या कांदा बराकीत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले. या परिसरात पारगाव, शिंगवे, वळती, रांजणी, नागापूर, थोरांदळे परिसरात कांदा बाजारपेठेत
पाठविण्याची लगबग सुरू आहे. येथील शेतकरी मंचर, लोणी या बाजार पेठेत कांदा विक्रीसाठी पाठवतात. बराकीतील कांदे निम्म्याहून अधिक सडल्याने शेतकरीवर्गात नाराजीचे वातावरण दिसत आहे.

SCROLL FOR NEXT