इंदापूर तालुक्यात मका पिकाच्या क्षेत्रात वाढ Pudhari
पुणे

Indapur News: इंदापूर तालुक्यात मका पिकाच्या क्षेत्रात वाढ

मान्सूनपूर्व पावसामुळे पेरणी झालेल्या पिकाची चांगली वाढ

पुढारी वृत्तसेवा

बावडा: इंदापूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकर्‍यांनी तातडीने नियोजन करून लगबगीने खरीप हंगामातील मका पिकाची पेरणी मोठ्या क्षेत्रावर केली आहे. पेरणी झालेले मक्याचे पीक सध्या चांगले उगवून आले असून, सध्या सुरू असलेला मान्सूनचा पाऊस मका पिकाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे.

इंदापूर तालुक्यात गेल्या तीन-चार दशकांपासून मक्याचे पीक मोठ्या क्षेत्रावर तीनही हंगामांत घेतले जात आहे. या पिकाने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक आधार दिला असून, शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये मका पिकाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे चालू खरीप हंगामामध्ये समाधानकारक पाऊस होताच शेतकर्‍यांनी उपलब्ध क्षेत्रावर मक्याची पेरणी केली. (Latest Pune News)

मका बियाण्यांच्या किमतीमध्ये बियाणे कंपन्यांनी चालू खरीप हंगामात वाढ केल्याने शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली. सध्या सर्वत्र मक्याचे उगवलेले पीक दिसून येत आहे. आगामी काळात पिकाच्या वाढीच्या अवस्थेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. लष्करी अळीचा वेळेत बंदोबस्त केला तर मक्याचे समाधानकारक उत्पन्न येते, अशी माहिती प्रगतशील युवा शेतकरी संग्रामसिंह पाटील, विद्यासागर घोगरे, विक्रांत घोगरे (बावडा) यांनी दिली.

जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच, मका पिकापासून शेतकरीवर्ग मुरघास तयार करीत आहेत. शिवाय, बाजारामध्ये मक्याला प्रतिक्विंटल चांगला बाजार मिळत असल्याने शेतकर्‍यांना नियमित आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

त्याचप्रमाणे मका पिकाच्या काढणीनंतर वाळलेल्या मकवानाची साठवणूक करून चार्‍यासाठी वापर केला जात आहे. शिवाय बुरकुंडाचा वापर देखील ज्वलनासाठी होत आहे. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत तिन्ही हंगामांत येणारे मक्याचे पीक शेतकऱ्यांना कल्पवृक्षासारखे वाटत आहे, अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अजितराव घोगरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT