पुणे

पिंपरी : ताथवडे मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या खर्चात 18 कोटींनी वाढ

अमृता चौगुले

पिंपरी : ताथवडे परिसरात मैलासांडपाणी केंद्र (एसटीपी) नसल्याने तेथील सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तेथे 10 एमएलडीऐवजी 20 एमएलडी क्षमतेचा मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. त्याचा खर्च 30 कोटींवर 48 कोटींवर गेला आहे.

नदीत पाणी सोडल्याने जलप्रदूषण

ताथवडे हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या भागात विविध गृहप्रकल्प तसेच, इतर निवासी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. त्या भागात मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र नसल्याने सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. मात्र, शुद्धीकरण केंद्र उभारण्यास पालिकेस मुहूर्त मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

पालिकेने ताथवडे सर्व्हे क्रमांक 19 येथक्षील आरक्षण क्रमांक 6 येथे केंद्र बांधण्याचे डीपीमध्ये आरक्षण ठेवले आहे. ती जागा राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाची आहे. ती जागा ताब्यात घेण्यासाठी सन 2009 पासून पालिका पाठपुरावा करीत आहे. राज्य शासनाने 27 फेब—ुवारी 2023 ला ती जागा पालिकेस हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रासाठी 0.7 हेक्टर जागा आवश्यक आहे.

वाढीव 48 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

त्या ठिकाणी 10 एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन होते. मात्र, त्या भागातील वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन 20 एमएलडी क्षमतेचे केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या कामासाठी सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. एजन्सीच्या अहवालानुसार केंद्रासाठी 48 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात या कामासाठी येणार्‍या 30 कोटीच्या खर्चाला मान्यता देऊन 1 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

आता, या केंद्राचा खर्च 18 कोटींने वाढला आहे. वाढीव 48 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव जलनिस्सारण विभागाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे वाढीव खर्चासह शुद्धीकरण केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT