इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : मागील काही महिन्यांत इंदापूर बसस्थानकात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी इंदापूर बसस्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढवण्याची मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाने केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी आगारप्रमुख महेबूब मनेर यांना दिले. इंदापूर बसस्थानकामध्ये दिवसेंदिवस प्रवाशांचे साहित्य, दागिने, रोख रक्कम, मोबाईल यासह मौल्यवान वस्तूंच्या चोरीचे प्रमाण वाढले असून यामध्ये प्रवाशांची लूट होत आहे.
या गोष्टीची इंदापूर आगारप्रमुखांनी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. इंदापूर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेर्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत. यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार, तालुका कार्याध्यक्ष सचिन जाधव, सुभाष साळुंखे, सचिन सावंत, रोहन देवकर, आकाश चव्हाण, नितीन चौधरी आदींच्या सह्या.