पुणे

पिंपरी : महापालिकेच्या 8 केंद्रांवर आज ज्येष्ठांना ‘इन्कोव्हॅक’ लसीचा बूस्टर

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने 60 वर्ष व त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक 'इन्कोव्हॅक' लसीचा बूस्टर डोस नाकावाटे देण्यात येणार आहे. महापालिकेच्या 8 केंद्रांवर हे डोस शनिवारी (दि. 29) दिले जाणार आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत हे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी 20 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, कोर्बेव्हॅक्स यापैकी एकही लस महापालिकेला देण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनाने त्याबाबत मागणी केलेली आहे. दरम्यान, इन्कोव्हॅक ही लस मात्र उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे उपलब्ध लसीच्या साठ्यानुसार महापालिका प्रशासनाने ही लस ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस (प्रिकॉशन डोस) म्हणून देण्याचे नियोजन केले आहे.
ज्या़ ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दुसर्‍या डोसनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्यांना ही लस दिली जाणार आहे.

'ऑऩ द स्पॉट' नोंदणी पद्धतीने ही लस दिली जाणार आहे. शासनाच्या निकषानुसार हे लसीकरण करण्यात येणार आहे. शनिवारी ही लस दिली जाणार असली तरीही लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुटी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र रविवारी मात्र बंद राहणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

'इन्कोव्हॅक' लस देण्यात येणारे केंद्र

ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल (आकुर्डी), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय (चिंचवड), नवीन थेरगाव रुग्णालय (थेरगाव), नवीन भोसरी रुग्णालय (भोसरी), यमुनानगर रुग्णालय (यमुनानगर), नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी), अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा (सांगवी), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, कुटुंब कल्याण विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT