कार्ला : कार्ला-मळवली मार्गावरील इंद्रायणी नदी पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी पर्यायी मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सन 2019 साली पुलावर पसरलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना भेट देण्यासाठी 30 वर्षे जुन्या पुलाचा वापर करणार्या गावकरी आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मावळचे सहायक अभियंता आर. आर. सोनवणे यांनी हा एकपदरी पूल वापरण्यास सुरक्षित असल्याचे घोषित केले. तसेच, हा पूल दुपदरी बांधण्यासाठी 8 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले होते.
कार्ला परिसरातील टाकवे, शिलाटणे, वेहेरगाव, दहिवली, कार्ला, देवले, पाटण, मळवली, बोरज, ताजे, भाजे, लोहगड आदी गावात राहणारे विद्यार्थी, नागरिक जवळपास दहा हजार नागरिक येण्या-जाण्यासाठी या पुलावर अवलंबून आहेत. भाजे हे पर्यटन स्थळ असल्याने या पुलावरून सुट्टीच्या दिवशी जास्त प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच हा एकपदरी पूल असल्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कार्ला ग्रामस्थांकडून याचा पाठपुरावा केल्याने कार्ला मळवली इंद्रायणी नदीवरील दुपदरी पुलाचे काम मार्गस्त आहे. या पुलाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम हे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे, अन्यथा परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटेल. पावसाळ्यात इंद्रायणी नदीला या ठिकाणी खूप पाणी असते. त्यातच पर्यायी मार्ग हा नदी पात्रातून काढला असून, नदीच्या प्रवाहात तो वाहून जाऊ शकतो.
– विशाल हुलावळे, सरचिटणीस, मावळ तालुका युवा सेना
हेही वाचा