पुणे

पुणे : निवासी डॉक्टरांच्या संपामुळे गैरसोय

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पाच हजारांहून अधिक डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले. त्यामध्ये ससूनमधील 600 निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. तातडीच्या रुग्णांसाठी शंभर ते सव्वाशे डॉक्टर सेवेत होते. अतिदक्षता विभाग तसेच तातडीचे रुग्ण वगळता इतर सर्व विभागांत काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसेवेवरही परिणाम झाला. ससून रुग्णालयात नेहमीप्रमाणे सकाळपासूनच रुग्णांची वर्दळ सुरू झाली.

निवासी डॉक्टरांचा संप असल्याचे माहीत नसल्याने गर्दी वाढतच होती. ओपीडीमध्ये निवासी डॉक्टरांअभावी वरिष्ठ निवासी डॉक्टर, प्राध्यापक यांच्यावर रुग्ण तपासणीचा ताण आला होता. तपासणीसाठी उशीर होत असल्याने रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. आंतररुग्ण विभागातील रुग्णसेवेवरही काहीसा परिणाम झाला. तातडीचे उपचार आवश्यक असलेल्या दोन-तीन टक्के रुग्णांनाच दाखल करून घेण्यात आले. नियोजित शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना परत पाठवण्यात आले. अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या.

ससूनमधील 600 पैकी तातडीच्या सर्व सेवा तसेच आयसीयूमधील रुग्णांना सेवा देण्यात आली. त्यासाठी 100 डॉक्टर कामावर होते व इतर संपावर होते.

                            – डॉ. किरण घुगे, सचिव, मार्ड संघटना

SCROLL FOR NEXT