पुणे

कोलाड महामार्गाचे अपूर्ण काम लोकसहभागातून पूर्ण

अमृता चौगुले

पौड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेली अनेक वर्षे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही भूगावातून जाणार्‍या पुणे – कोलाड महामार्गाचे अपूर्ण काम पूर्ण होत नव्हते. अरुंद रस्ता व खड्ड्यांमुळे सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीतून भूगावकरांसह प्रवाशांची मुक्तता व्हावी यासाठी भूगाव ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला. लोकसहभागातून या अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. यात सुमारे दोनशे स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. हा रस्ता 9 ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रस्त्याच्या कामात अनेकांनी आर्थिक मदत केली. तसेच गेले पंधरा दिवस प्रशासनाच्या मदतीशिवाय अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वाहतुकीचे नियोजन करून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण केले. यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता झाली आहे.

तत्कालीन सरपंच निकिता सणस, उपसरपंच स्वस्तिक चोंधे यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट 2019 रोजी रास्ता रोको आंदोलनापासून सुरू झालेला लढा गेली चार वर्षे सुरूच होता. ग्रामपंचायत, निकिता सणस, माजी सरपंच वनिता तांगडे, सरपंच अर्चना सुर्वे, आजी माजी उपसरपंच आदींचा एमएसआरडीसी, पीएमआरडीए, रोडवेज सोल्यूशन, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. परंतु, सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.

दुसरीकडे रस्ता दुरुस्तीवर मार्ग काढण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, राहुल शेडगे हे येथील बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा करत होते. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. लोकसहभाग आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या सहकार्याने रस्ता दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी रमेश सणस, जीवन कांबळे, जितेंद्र इंगवले,उपसरपंच दिनेश सुर्वे, वैशाली महेश सणस, विशाल भिलारे, योगेश चोंधे, संकेत कांबळे, सुनीता चोंधे, सुरेखा शेडगे आदींसह भूगाव ग्रामस्थ व तरुणांनी स्वीकारली. रस्त्याचे काम योगायोगाने 9 ऑगस्ट 2023 रोजी पूर्ण झाले. याच मुहूर्तवार दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. रस्त्याची रुंदी पूर्वी 4.5 मीटर होती ती आता 7 मीटर झाली आहे. साइडपट्टीसह रुंदी 10 मीटर झाली आहे.

SCROLL FOR NEXT