पुणे

पिंपरी : आषाढी यात्रेमुळे एसटीला लाखोंचे उत्पन्न

अमृता चौगुले

राहुल हातोले : 

पिंपरी : वल्लभनगर आगारामधून आषाढीवारीनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी 24 जादा बस सोडण्यात आल्या. एकूण 7 दिवसांमध्ये 7 लाखांचे विक्रमी उत्पन्न आगाराला मिळाले आहे. सर्व बस 100 टक्के प्रवाशांनी भरून धावत असल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामधून आपल्या लाडक्या पंढरपूरच्या विठू माउलीच्या दर्शनाला दरवर्षी जाणार्‍या भक्तांची संख्या मोठी आहे. या काळात खासगी वाहनांचे चांगलेच फावते. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारून त्यांची लूट केली जाते. मात्र याउलट एसटी वाजवी दरात भाविकांना सेवा देते. खासगी वाहतुकीने होणारी भाविकांची ही लूट आणि होणारी गैरसोय टाळावी.+

तसेच योग्य, वेळेवर आणि सुरक्षित सेवा दिली जावी, म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा गाड्यांची सोय केली जाते. त्यानुसार, वल्लभनगर आगारामधून पंढरपुरसाठी आषाढी एकादशी यात्रेनिमित्त 26 जून ते 3 जुलै या दिवसांत एसटीच्या जादा बसची सोय करण्यात आली होती. या बसच्या एकुण 50 फेर्‍यांमधून 6 लाख 94 हजार 772 रूपये एवढे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत जमा झाले आहे. या यात्रेचा लाभ प्रौढांसह लहान मुलांनी देखील घेतला आहे. सर्व बसच्या जागा यात्रेच्या शेवटच्या दिवसापर्यंत फुल असल्याची माहिती बसच्या चालक-वाहकांनी दिली.

आषाढीला सर्वाधिक उत्पन्न
आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवारी (दि. 29) आगारातील बसचे एकूण उत्पन्न 2 लाख 30 हजार सत्तर रुपये इतके प्राप्त झाले आहे. हे एका दिवसात मिळालेले सर्वाधिक उत्पन्न होते.

शहरातील भाविकांच्या सेवेसाठी दरवेळी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या जादा बसेस सोडण्यात येतात. प्रवाशांना योग्य आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. त्यामुळे प्रवाशांचा खासगीपेक्षा महामंडळाच्या बसेसवर अधिक विश्वास आहे. परिणामी सर्व बस प्रवाशांनी भरुन वाहत होत्या.
                               -संजय वाळवे, एसटी आगार व्यवस्थापक, वल्लभनगर 

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT