तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: शालेय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधित्वाची मिळालेली संधी नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आहे. ती निभावताना निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आपापल्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ओळखून इतर विद्यार्थी नेतृत्ववान होतील असे प्रेरणादायी काम करावे, असे आवाहन विविध मान्यवरांनी तळेगाव येथील कांतीलाल शाह विद्यालयात आयोजित 'इन्व्हेस्टीचर सिरेमनी'(पदभार प्रदान) समारंभात केले. अमिन खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास संस्थेचे विश्वस्त शैलेश शाह, डॉ.शाळीग्राम भंडारी उपस्थित होते.
प्राचार्या पद्मिनी तेजानी यांच्या समवेत विद्यार्थी परिषदेच्या जल, अग्नी, पृथ्वी आणि वायू या प्रमुख समित्यांसह इतर विद्यार्थी परिषदेच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते पदे प्रदान करण्यात आली. अमिन खान यांनी 'इन्व्हेस्टीचर सिरेमनी'चे महत्व स्पष्ट केले. डॉ. भंडारी यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची संधी या पदप्रदान समारंभामुळे आली असून उत्तम काम करण्याचे आवाहन केले. प्राचार्य पद्मिनी तेजानी म्हणाल्या, की विद्यार्थी प्रतिनिधींनी कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा नेतृत्ववान विद्यार्थी घडतील, अशी आदर्श कामगिरी करून दाखवली पाहिजे. शिक्षिका उषा टोनपी व मानसी देशमुख, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम मोरे आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन अदिती मुदलीयर यांनी केले