पुणे

वखवखलेल्या नजरा चुकवत ‘ती’ वावरते!

अमृता चौगुले

वडगाव शेरी : वडगाव शेरी, विमाननगर, खराडी, चंदननगर परिसरातील काही रस्त्यांवर सायंकाळी सहानंतर मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. तसेच शाळा, खासगी शिकवण्यांच्या ठिकाणी रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. यामुळे परिसरात महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वडगाव शेरीतील नगर रोडवरून सोपान नगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या परिसरातील मोकळ्या जागेत सायंकाळच्या सुमारास मद्यपी मद्यपान करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमनाथनगर, इन ऑर्बिट मॉलच्या मागे असलेल्या खाऊगल्लीत अनेक उपद्रवी तरुणांची टोळकी बसलेली असतात. राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वडगाव शेरी गावठाण शाळेबाहेर, कल्याणीनगर लँडमार्क गार्डनबाहेर, सुंदराबाई शाळेबाहेर, स्टेला मारी शाळा, सेंट फ्रान्सिस शाळा, मंत्री मार्केट तसेच परिसरातील खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात रोडरोमिओचा वावर वाढला आहे.

गणेशनगर, ऑक्सिजन पार्क आणि चंदननगर येथील भाजी मंडईच्या परिसरातदेखील काही तरुण कर्कश हॉर्न वाजवत दुचाकी भरधाव वेगाने दामटत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विमाननगरमधील सीसीडी चौक ते म्हाडा कॉलनी, आयटी टॉवरबाहेरील हातगाड्या, खराडी येथील खाऊगल्ली या ठिकाणीदेखील रोडरोमिओंचा उपद्रव सुरू आहे. संध्याकाळी मद्यपी आणि रोडरोमिओंचा त्रास सहन कारावा लागत आहे. यामुळे अनेकदा रस्ताही बदलावा लागत असल्याचे परिसरातील महिलांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी माजी नगरसेविका र्श्वेता गलांडे यांनी पोलिस उपआयुक्तांकडे केली होती. यानुसार पोलिसांनी गस्त वाढवली आहे. परंतु पोलिस गेल्यानंतर पुन्हा मद्यपी रस्त्यावर येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वडगाव शेरी परिसरातील काही शाळा व खासगी शिवकणी वर्गांच्या बाहेर अनेकदा उपद्रवी तरुणांची टोळकी थांबलेली असतात. यामुळे मुलींना सुरक्षितपणे वावरता येत नाही. तसेच मद्यपी आणि रोडरोमिओंचा त्रासही महिला आणि मुलींना सध्या सहन करावा लागत आहे. पोलिसांनी दररोज सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी गस्त घातली पाहिले.
                                                      – नीता गलांडे, सामाजिक कार्यकर्त्या.

भाजी मंडई, शाळा, खासगी शिकवणी वर्गांसह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू आहे. महिलांच्या तक्रार आल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाते. सोपाननगर येथील मोकळ्या जागेत बसणार्‍या मद्यपींवर कारवाई केली आहे. मुलींना व महिलांनी घाबरू नये. सुरक्षिततेबाबत काही समस्या असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

SCROLL FOR NEXT