पुणे

इंदापूर : वीजबिल सवलतीच्या नावाखाली अनेकांना ऑनलाइन गंडा; नागरिकांनी सावध राहण्याची गरज

अमृता चौगुले

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : मोबाईलवर 'तुमचे वीजबिल थकीत आहे आणि ते तातडीने भरा, नाहीतर तुमची वीज कापली जाईल आणि जर तुम्ही वीजबिल तातडीने भरले, तर तुम्हाला 50 टक्के सवलत मिळेल,' असा जर संदेश प्राप्त झाला आणि ऑनलाइन वीजबिल भरण्याची गळ तुम्हाला घातली, तर तुमच्या बँकेच्या खात्याला कात्री लागू शकते. त्यामुळे मोबाईलवर आलेल्या संदेशापासून नागरिकांनी खबरदारी घेऊन खात्री करूनच पुढील व्यवहार करावा; अन्यथा तुमच्या अज्ञानपणाचा गैरफायदा ऑनलाइन गंडा घालणार्‍या टोळीने घेतला म्हणून समजा. इंदापूर तालुक्यात अशी अनेक उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत.

याबाबत गलांडवाडी नंबर 2 येथील शेतकरी नवनाथ चांगदेव साळुंखे यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार इंदापूर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. 28) दाखल केली. साळुंखे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, बुधवारी (दि. 27) त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एका अनोळखी नंबरवरून संदेश प्राप्त झाला. 'तुमचे वीजबिल थकले आहे, ते तातडीने भरा; अन्यथा तुमची वीज कापली जाईल' असा संदेश आला. यावर साळुंखे यांनी त्या अनोळखी क्रमांकावर फोन केला

. त्या वेळी समोरून 'मी महावितरणकडून बोलत आहे. तुमची वीज कापली जाणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या शेवटच्या बिलातील 400 रुपये तत्काळ भरा व तुमच्या सर्व बिलामध्ये 50 टक्के सवलत मिळवा,' असे सांगण्यात आले. त्यानंतर साळुंखे यांनी फोन पेद्वारे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सफल झाला नाही.

त्यानंतर त्या अनोळखी इसमाने 'तुमच्या एटीएम कार्डचा नंबर सांगा, सर्व माहिती द्या,' अशी गळ घातली. त्यावर साळुंखे यांनी आपल्याला 50 टक्के वीजबिलाची सवलत मिळेल, यावर विश्वास ठेवून आपल्या एटीएम कार्डची सर्व ती माहिती समोरच्या व्यक्तीला सांगितली. काही क्षणातच साळुंखे यांना आपल्या खात्यावरून प्रथम 400 रुपये आणि त्यानंतर लागलीच 6 हजार 677 रुपये कपात झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे साळुंखे यांचे खाते काही क्षणात रिकामे झाले. साळुंखे यांच्यासारखाच इंदापुरातील अनेकांना या टोळीने ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT