पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने शनिवारपेठेतील वर्तक बाग येथील जागा फटाका स्टॉलसाठी भाड्याने देण्यासाठी झालेल्या लिलावात व्यावसायिकांत वादावादी झाली. तेथे 35 स्टॉल लावण्यात आले. त्यातून महापालिकेला 14 लाख साठ हजार रुपये उत्पन्न मिळाले. एका स्टॉलसाठी सर्वाधिक बोली एक लाख दहा हजार रुपयांची लागली. दिवाळीनिमित्त फटाके विक्रीसाठी शनिवारपेठेतील वर्तक बागेच्या शेजारी नदीकाठच्या रस्त्यावर स्टॉल लावले जातात. यंदा 35 स्टॉल भाड्याने देण्यासाठी महापालिकेने अर्ज मागविल्यानंतर 66 व्यावसायिकांनी अर्ज केले होते. प्रत्येक स्टॉलसाठी 23 हजार 595 इतके मूळ भाडे निश्चित केले होते.
महापालिका भवनात लिलाव लावताना व्यावसायिकांकडून बोली लावण्यास सुरवात झाल्यानंतर काही मंडळांच्या पदाधिकार्यांनी दादागिरी करत बोली लावण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून सभागृहाच्या बाहेर व्यावसायिकांमध्ये जोरदार वादावादी, शिवीगाळ सुरू झाली. त्यामुळे येथील वातावरण तापले होते. अखेर काही जणांनी हस्तक्षेप करून हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला.
मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, 35 स्टॉलसाठी लिलावातून महापालिकेला 14 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. व्यावसायिकांमधील वाद सभागृहाच्या बाहेर झाला आहे, आतमध्ये झालेला नाही.