पुणे

राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकार्‍यांनीच वाचला तक्रारींचा पाढा

अमृता चौगुले

सांगवी : पुढारी वृत्तसेवा :  माळेगाव कारखान्याचे ऊसतोडणीसाठी फसलेले नियोजन व नोकरभरतीत झालेल्या दुजाभावाची वागणूक, यामुळे खुद्द पदाधिकारीच आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. या दोन्ही प्रकारच्या घटनांसह विकासकामांच्या तक्रारीचा पाढाच दोन्ही गावच्या पदाधिकार्‍यांनी वाचल्याने सांगवी व शिरवली येथील राष्ट्रवादी काँग्रेसची घोंगडी बैठक वादळी ठरली. बारामती तालुक्यातील सांगवी व शिरवली येथे रविवारी (दि. 11) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (अजित पवार गट)ची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोंगडी बैठका झाल्या. या बैठकीत माळेगाव कारखान्याचे ऊसतोडणीचे फसलेले नियोजन, लांबत चाललेली ऊसतोड एकरी घटत असताना सत्ताधारी संचालकांचा आडसाली ऊसासह खोडवा व निडवा तुटून गेल्याचा आरोप संतप्त पदाधिकार्‍यांनी केला. माळेगाव कारखान्याच्या गट क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांना डावलून नव्याने आलेल्या व समझोता केलेल्या संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले, परंतु माळेगाव कारखान्यात नोकरभरती करताना दुजाभाव केल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.

वरील दोन्ही मुद्द्यांसह बारामती-फलटण महामार्गाचे रुंदीकरण करताना नागरिकांच्या अडचणींसह पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, पाच दिवसांनी मिळणारे पाणी, जलजीवनचे रेंगाळत असलेले काम, वाड्या-वस्त्यांवरील रखडलेली रस्त्यांची कामे, स्थानिक ठेकेदारांची मनमानी होत असल्याच्या तक्रारीही मांडण्यात आल्या. काही तक्रारदारांनी जर वेळेवर कामे झाली नाहीत तर येणार्‍या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास देवकाते, माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक मदनराव देवकाते, अनिल तावरे, योगेश जगताप, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले, दुध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, माजी अध्यक्ष प्रकाशराव तावरे, अजितदादा वाहतूक संघाचे संचालक प्रतापराव तावरे, सरपंच चंद्रकांत तावरे, बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे, माजी संचालक विलासराव तावरे, बाळासाहेब वाबळे, विजय तावरे, किरण तावरे, महेश तावरे यांच्यासह दोन्ही गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

व्यथा अजित पवार यांना सांगणार
सांगवी व शिरवली येथे खुद्द पदाधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या असल्याने या सर्व व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालणार असल्याचे संभाजी होळकर व विश्वास देवकाते यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.

आजी-माजी संचालकांचे तू-तू-मैं-मैं !
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीस होत असलेल्या विलंबाने हवालदिल झालेले माजी संचालक बाळासाहेब वाबळे यांनी व्यथा मांडली असता विद्यमान संचालक योगेश जगताप यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वेळी तू-तू-मैं-मैं झाल्याने वाबळे हे बैठक सोडून जात असताना काही काळ गोंधळ उडाला. कारखान्याच्या पुढील निवडणुकीत आम्हाला गृहीत धरू नका, असे वाबळे यांनी ठणकावून सांगितले.

SCROLL FOR NEXT