महेंद्र कांबळे
बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच पुण्यात स्कुल व्हॅन चालकाने सहा वर्षच्या दोन चिमुरड्यांवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या नराधम आरोपीला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. संजय ( 45, वैदूवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दाखल गुन्ह्यानुसार, पीडित सहा वर्षीय मुलगी पुण्यातील नामांकित शाळेत शिकण्यास आहे. तर आरोपी संजय याच्या व्हॅनमधून मुलगी ये जा करत होती. 30 सप्टेंबर रोजी चिमुरडी शाळेतून घरी आली असता मुलीला काहीतरी त्रास होत असल्याचे आईला जाणवले. त्यावेळी आईने तिच्या शरीराची तपासणी केली असता तिच्या अवघड जागी लालसर झाले असल्याचे त्यांना दिसले. त्यावर आईने चिमुरडीला जवळ घेऊन प्रेमाने विचारले असता त्यावेळी तिने स्कुलबस चालक संजय अंकल हा रोज घरी येताना अश्लील चाळे करत असल्याचे तिने सांगितले. तसेच चार दिवसांपासून हा प्रकार मैत्रिणीबरोबर देखील सुरू असल्याचे तिने आईला सांगितले.
हे ऐकल्यावर मुलीच्या आईने चिमुरडीवरील घडलेल्या प्रकारची खात्री करण्यासाठी मुलीला वडिलांबरोबर शाळेत पाठवले. तसेच चिमुरडीच्या वडिलांना तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन हा प्रकार सांगण्यास सांगितले. त्यावर चिमुरडीच्या मैत्रिणीच्या आईने देखील तिची अवघड जागा तपासली असता व मुलीला विचारणा केली असता आरोपी हा घरी येत असताना अश्लील पद्धतीने चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगितला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नराधम आरोपी संजय याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वानवडी पोलिस करत आहे. या घटनेमुळे स्कुल बसमधून प्रवास करणाऱ्या मुला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.