पुण्यात संभाजी ब्रिगेडचे आत्मक्लेश आंदोलन Pudhari
पुणे

पुण्यात संभाजी ब्रिगेडचे आत्मक्लेश आंदोलन

राज्य सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विधानाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य संघटक अजय भोसले, शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर, कार्याध्यक्ष वैभव शिंदे, उपाध्यक्ष रवी पवार, जिल्हाध्यक्ष संतोष हगवणे, प्रदिप कणसे यांसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर, अनिल ताडगे, रेखा कोंडे यांनीही यावेळी पाठिंबा दिला.

यावेळी भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर येऊन जवळपास महिन्याभराचा कालावधी उलटून देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

ती घटना थांबत नाही तोवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रशांत कोरटकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले असून यावरून पुन्हा एकदा राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. महापुरुषांविरोधात वादग्रस्त विधान करणार्‍यावर राज्य सरकारकडून कारवाई होत नाही. त्याच्या निषेधार्थ हे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष प्रशांत कुंजीर म्हणाले, मागील कित्येक वर्षांपासून विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तींकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने केल्याचे समोर आले आहे. पण त्या लोकांना राज्य सरकारकडून संरक्षण दिले जात आहे.

आम्ही त्याचा निषेध व्यक्त करीत असून आता प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी जी विधाने केली आहेत त्या दोघांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करीत आहोत. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घ्यावी, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT