पुणे

नारायणगावात तमाशापंढरी राहुट्यांनी सजली

अमृता चौगुले

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : यात्रेचा हंगाम काही ठिकाणी सुरू झाला आहे, तर काही ठिकाणी लवकरच सुरू होणार असल्याने नव्याने नामांतरण करण्यात आलेल्या विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरीत राज्यातील लहान-मोठ्या 30 ते 35 फडमालकांनी आकर्षक, रंगीबेरंगी राहुट्या उभारून तमाशा कार्यक्रमाचे करार (सुपारी) ठरविण्यास सुरुवात केली आहे.

मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील सभापती कॉर्नरजवळील पुणे-नाशिक महामार्गालगत उभारण्यात आलेल्या तमाशाच्या राहुट्या लक्ष वेधून घेत आहेत. गावोगावच्या पदाधिकार्‍यांची यात्रेसाठी तमाशा ठरविण्याकामी याठिकाणी ये-जा वाढली आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव असतात. या निमित्ताने करमणुकीसाठी तमाशा कार्यक्रम ठेवण्याची या भागात जुनी परंपरा आहे.

त्या दृष्टिकोनातून दरवर्षी नारायणगाव तमाशा पंढरीत अनेक फडमालक कार्यक्रमाची सुपारी घेण्यासाठी आपल्या लहान-मोठ्या राहुट्या लावत असतात. राहुट्याच्या बाहेरील बाजूस तमाशा फडमालक आपल्या नावाचे रंगीबेरंगी फ्लेक्स लावून त्यावर नृत्यांगना व कलाकारांचे फोटो लावतात. या ठिकाणी कार्यक्रमाचे करार करण्यासाठी फडमालक अथवा त्यांचा व्यवस्थापक असतो.

नारायणगाव हे तमाशाचे केंद्र आहे. आपापल्या गावच्या यात्रेसाठी तमाशा ठरविण्यासाठी गावच्या यात्रा कमिटीचे प्रमुख व सदस्य, सरपंच राहुटीला भेट देऊन फडमालक अथवा व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून आगाऊ रक्कम देऊन करार (सुपारी)करतात. करारात वेळ, रक्कम, कलावंत संख्या, महिला नृत्यांगनांचा ताफा, वगनाट्याचे नाव आदींची माहिती दिली जाते.

यंदा विठाबाई नारायणगावकर तमाशा पंढरीत विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, मालती इनामदार नारायणगावकर, पांडुरंग मुळेसह तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, काळूबाळू, भिका भीमा सांगवीकर आनंद लोकनाट्य, दत्ता महाडिक, अंजली राजे नाशिककर, आम्रपाली पुणेकर, दीपाली पुणेकर, संध्या माने, प्रकाश अहिरेकरसह नीलेश अहिरेकर आदींसह इतर लहान मोठ्या 35 तमाशा फडमालकांनी आपल्या राहुट्या येथे उभारल्या आहेत.

यापैकी काही फडमालकांचे यात्रेचे करार झाले असून, काही जण प्रतीक्षेत आहेत. यात्रेचा हंगाम चालू झाला असून, येणार्‍या दिवसांमध्ये गुढीपाडवा (22 मार्च), चैत्र पौर्णिमा (6 एप्रिल). कालाष्टमी (13 एप्रिल), नवमी (14 एप्रिल), अक्षय तृतीया (22 एप्रिल), बुद्ध पौर्णिमा (5 मे) या प्रमुख तारखांचे करार झाले असल्याचे फडमालकांनी सांगितले.

बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदींच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने गावकर्‍यांना खुश ठेवण्यासाठी तमाशा कार्यक्रमाला मागणी वाढण्याची शक्यता. सरपंच बाबू पाटे यांच्या प्रयत्नाने नारायणगाव ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतने राहुट्यासाठी मोफत जागा, पाणी आदींची व्यवस्था करून दिली आहे.

हजेरीसह वगनाट्य, गणगौळण,
रंगबाजी आदींसाठी जास्त कलावंत असलेल्या मोठ्या तमाशाचा दर 3 लाख रुपये, तर कमी कलावंत असलेल्या लहान तमाशाचा दर दीड ते दोन लाख रुपये आहे.

राजकीय उलथापालथीमध्ये तमाशा फडमालक आणि कलाकार पूर्णपणे भरडले गेलेले असून, कोरोना कालखंडामध्ये कलापथकांसाठी 'कोरोना विशेष साहाय्य योजना' आघाडी सरकारने जाहीर केली होती. मात्र, सरकार बदलल्याने फक्त तीनच कलापथकांना
याचा फायदा झाला. त्यानंतर नवीन शिंदे सरकारकडून बाकी लोककलावंतांकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यातील लोक कलावंतांसाठी मफविठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळफफ स्थापन करण्यात यावे.

                     मोहित नारायणगावकर, अविष्कार मुळे तमाशा फडमालक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT