खडकवासला: खडकवासला विधानसभा मतदारसंघात पुरवठा विभागाच्या वतीने अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रेशन कार्डधारकांची पडताळणी करण्यात येणार असून, शासन निर्णयानुसार खोटी माहिती देणार्या कार्डधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत खडकवासला विधानसभा अन्नधान्य पुरवठा विभागाच्या निरीक्षक डॉ. पल्लवी सपकाळे म्हणाल्या, शासनाच्या आदेशानुसार अपात्र रेशनकार्ड शोधमोहीम राबवली जात आहे. त्यासाठी बुधवारी (दि.9) रेशन दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना सूचनाही दिल्या आहेत. धान्यवाटप करताना लाभार्थी कार्डधारकांचे अर्ज भरले जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांचे धान्यवाटप बंद करण्यात येणार आहे व रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.रेशनिंगचे अन्नधान्य घेणार्या कार्डधारकांनी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची खोटी माहिती दिल्यास आवश्यक तेथे पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश
शासकीय सेवेत तसेच घरात शासकीय पेन्शनधारक असताना तसेच एकत्रित कुटुंबाचे लाखो रुपयांचे उत्पन्न असताना अनेक जण शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. याला आळा घालण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 4 एप्रिल 2025 रोजी याबाबत परिपत्रक काढले आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अन्नपुरवठा विभागाला देण्यात आले आहे.
कार्डधारकांची संख्या निम्म्याहून कमी होणार
शासनाच्या या निर्णयामुळे सिंहगड खडकवासला, पश्चिम हवेलीतील कार्डधारकांची संख्या निम्म्याहून कमी होणार असल्याची चर्चा रेशनिंग दुकानदारांत सुरू आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात मोफत धान्य योजनेचा लाभ घेणार्या कार्डधारकांची संख्या 28 हजार इतकी आहे.