तीर्थक्षेत्र जेजुरीत पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण File Photo
पुणे

Jejuri News: तीर्थक्षेत्र जेजुरीत पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण

पुढारी वृत्तसेवा

Jejuri Latest News: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या श्रीखंडोबा देवाच्या तीर्थक्षेत्र जेजुरीला भर पावसाळ्यात दोन्ही धरणे भरूनही तीन दिवसांनी पिण्याचे पाणी सोडले जाते. पाण्यासाठी जेजुरीकरांसह भाविकांना वणवण करावी लागत आहे.

तीर्थक्षेत्र जेजुरीला 1974 पासून नाझरे धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध होते. या जलाशयाची पाणी साठवण क्षमता 788 दशलक्ष घनफूट असून, मृत साठा हा 200 दशलक्ष घनफूट एवढा आहे. या धरणातून जेजुरी शहराबरोबरच पुरंदर व बारामती तालुक्यातील 56 गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते, तर सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राला शेतीसाठी हंगामी पाणी दिले जाते.

2022 साली दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने तातडीची मांडकी डोहा पाणी योजना सुरू केली. दुष्काळ व पाणीटंचाईच्या काळात तातडीच्या मांडकी डोह योजनेतून पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, ही योजना सतत नादुरुस्त होत असल्याने दुरुस्तीचा खर्चच जास्त झाला आहे.

जेजुरी शहराची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार आहे तसेच जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या श्रीखंडोबादेवाच्या नगरीचे तीर्थक्षेत्र आहे.वर्षाकाठी येथे देवदर्शनासाठी 50 लाखांहून अधिक भाविक येत असतात.

येथे औद्योगिक क्षेत्र असल्याने सुमारे दहा हजार कामगार काम करतात. या सर्व लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही जेजुरी नगरपरिषदेची आहे.

परंतु सध्यातरी या जबाबदारीत नगरपालिका अपयशी ठरली आहे. मागील वर्षी कमी पावसामुळे नाझरे धरण कोरडे पडले होते. त्यामुळे प्रचंड पाणीटंचाईला जेजुरी शहराला सामोरे जावे लागले. या टंचाईवर मात करण्यासाठी तातडीची मांडकी डोहावरील योजना दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

या काळात आठ ते दहा दिवसांनी पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागले, परंतु सध्या जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत चांगला पाऊस झाला. नाझरे व वीर धरण भरून वाहू लागले.

धरणे भरल्याने पाणीटंचाई दूर होणार असे चित्र असताना सध्या ही तीन दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.आजही खासगी टँकरद्वारे नागरिक, हॉटेल्स, लॉजधारकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

दररोज पाणीपुरवठ्यासाठी दीड वर्ष थांबावे लागणार

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच वीर धरणावरून जेजुरीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी योजना मंजूर झाली असून, या योजनेचे टेंडर ही निघाले आहे. या योजनेत सुमारे 13 एमएलडी पाणी क्षमतेची पाण्याची टाकी उभारली जाणार आहे.

ही योजना दीड वर्षानंतर पूर्ण होणार असून, त्यानंतर शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आणखी दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जेजुरी शहराला सध्या नाझरे धरणातून तीन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जातो. नाझरे धरणावर पाणी उपसा करण्यासाठी 180 आणि 75 अश्वशक्तीचे पंप असून, मागणीनुसार ही क्षमता कमी आहे. जेजुरी येथील जलशुध्दीकरण केंद्र आणि शहरात असणार्‍या पाण्याच्या टाक्यांची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने दररोज पाणीपुरवठा होऊ शकत नाही. नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचा सतत प्रयत्न असतो.
- चारुदत्त इंगुले, मुख्याधिकारी, जेजुरी न. पा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT