थोरात विरुद्ध कूल; साहेबांचे नवीन राजकीय समीकरण 
पुणे

Maharashtra Assembly Polls: थोरात विरुद्ध कूल; साहेबांचे नवीन राजकीय समीकरण

साहेबांनी पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण उभे करत ‘थोरात विरुद्ध कुल’ हाच राजकीय सामना रंगवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र खोमणे

Political News: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यात पवार गटाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आणि तालुक्याला तिसरा पर्याय मिळणार, अशी जोरदार राजकीय चर्चा लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नसून साहेबांनी पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण उभे करत ‘थोरात विरुद्ध कुल’ हाच राजकीय सामना रंगवला आहे.

दौंडला मिळणारा तिसरा पर्याय सध्यातरी मावळला, तर इच्छुक निष्ठावंतांच्या निष्ठा अखेर निष्फळ ठरल्या, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी दै. ‘पुढारी’ने ‘शरद पवारांच्या मनातलं ओळखलंय कुणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते आणि अगदी तसेच झाले. त्यामुळे या वृत्ताची देखील जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार ‘जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करणार ते कधी बोलत नाहीत’ असे अनेक राजकीय मंडळी बोलून दाखवतात, याची प्रचिती विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यात पाहावयास मिळाली.

गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाबरोबर निष्ठेने काम करणार्‍या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तर माजी आमदार रमेश थोरात यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज देखील भरला. मात्र, या सगळ्या गोंधळात ‘निष्ठावंत’ कुठे असणार? त्यांची नेमकी भूमिका काय? याची देखील राजकीय चर्चा पारापारांवर सुरू आहे.

दौंड विधानसभेत शरदचंद्र पवार गटाकडून पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार व इतर काही जण इच्छुक होते. सर्वांनीच आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी साहेबांपर्यंत फिल्डिंग लावली होती आणि त्याच काळात साहेबांनी इच्छुकांना एकत्रितपणे फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांंपर्यंत पोहचण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

सूचनांचे पालन करत इच्छुकांनी गावभेट दौरेही केले होते. दौंड तालुक्याला पुन्हा एकदा ‘कुल विरुद्ध थोरात’ हा राजकीय सामना पूर्वीपेक्षा वेगळ्या प्रकारे अनुभवायला मिळणार आहे. कारण, लोकसभेला शरद पवारांविरोधात एकाच व्यासपीठावर आलेले नेते पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT