पुणे

बावधनमध्ये चक्क प्रशासनाकडूनच पदपथ गिळंकृत!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पायी चालणार्‍यांसाठी पदपथ आवश्यक असतानाही अनेक ठिकाणी बेकायदा व्यावसायिकांनी त्यावर बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. बावधनमध्ये तत्कालीन नगरसेवक आणि प्रशासनाने संगनमत करून पदपथ गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार दै. 'पुढारी'च्या पाहणीत उघड झाला आहे.

एनडीए चौकातून (चांदणी चौक) बावनधकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याला पदपथ आहे. मात्र, येथील एका गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशद्वारामुळे (गेट) पदपथ मध्येच संपतो. या ठिकाणी पदपथावरून चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिक थेट मुख्य रस्त्याच्या कडेने चालतात. तर बावधनकडून चांदणी चौकाकडे जाणार्‍या मार्गावर पदपथावर सार्वजनिक स्वच्छतागृह, बसस्थानक, ओपन जीम उभारण्यात आले आहे. त्यामुळे त्या मार्गावर पदपथच नसल्याचे दिसून आले. शिंदे पेट्रोल पंपापासून बावनधनकडे निघाल्यानंतर पदपथावर पेव्हर ब्लॉक नाहीत. त्यामुळे पदपथ असूनही काही उपयोग होत नाही. या ठिकाणी खासगी सभागृह असून, त्याचे फलक पदपथावरच लावले आहेत. परिणामी, पादचार्‍यांना मुख्य रस्त्याने चालावे लागते. एसबीआय बँकेसमोरील पदपथावर विजेचा डीपी नागरिकांना अडसर ठरत आहे. त्यापासून पुढे निघाल्यानंतर पदपथावरच महापालिकेचे लाखो रुपये खर्च करून वाचनकट्टा उभारण्यात आला आहे.

पदपथावर उभारल्या ओपन जिम

बांधकाम करायचे असेल, तर महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. बेकायदा बांधकाम केल्यास महापालिका कारवाई करते. मात्र, महापालिकेच्या निधीतून केल्या जाणार्‍या विकासकामांना परवानगी कोण देतो, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे कारण म्हणजे बावधनमध्ये पादचार्‍यांना चालण्यासाठी असलेल्या पदपथावर चक्क ओपन जिम उभारण्यात आली आहे. त्यामुळे पादचार्‍यांना प्रमुख रस्त्याने चालावे लागते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT