प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर : आपण किती जरी रस्त्याने सरळ चाललो, तरी समोरचा कशाप्रकारे वाहन चालवतो यावर बरेच अवलंबून असते. असे सांगून जपून प्रवास करा, असा सल्ला नेहमीच दिला जातो. याचाच प्रत्यय सध्या बारामती शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रवास करताना अनेक निरपराध लोकांना येत आहे. काही युवकांच्या बेफामपणे दुचाकी चालवण्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणार्या निरपराध लोकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये अनेकांना आपले अवयव गमवावे लागले आहेत, तर काहींना प्राणाला मुकावे लागले आहे. त्यामुळे बेदरकार, बेशिस्तपणे दुचाकी दामटणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कितीही लहान मुलगा असला आणि त्याला गाडी चालवायला आली की घरातील पालक मंडळी त्याला किरकोळ काम सांगून गाडी देतात. आपले काम होतेय हे पाहून ही मंडळी त्याचे गाडी चालवणे नियमात बसते की नाही याकडे दुर्लक्ष करतात. नको त्या वयात गाडी चालवायला मिळत असल्याने अंगात वेगळाच संचार येऊन मुले बेफामपणे गाडी चालवताना दिसत आहेत. अनेक युवक गाडी चालवताना समोरच्या प्रवाशाचा कसलाच विचार न करता जोरात गाडी चालवताना दिसतात. अनेक तरुण मोबाईलवर बोलत गाडी चालवणे म्हणजे ते एक प्रतिष्ठेचे असल्याचे समजत आहेत.
दरम्यान, ट्रीपल सीट गाडी चालवणे, मोठ्याने हॉर्न वाजवणे, समोरच्या वाहनाला जोरात कट मारणे, सायलेन्सरची पुंगळी काढणे, अचानक वळणे, करकचून ब्रेक दाबणे या बाबी तर नित्याच्याच झाल्या आहेत. अनेक युवक दारू पिऊन गाडी चालवतात या गंभीर बाबीकडे पोलिस खात्याचे कसे दुर्लक्ष होतेय हा संशोधनाचा विषय आहे.
पालकांची जबाबदारी
यामध्ये पालकांनी आपल्या मुलांच्या गाडी चालविण्याच्या पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण अशाप्रकारे गाडी चालविण्याने समोरच्याला अपघात होत असताना गाडीचालकाच्या जिवावर बेतल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे.
कायद्याचा धाक कुठेच दिसत नाही
सध्या बेफाम दुचाकी चालविणे म्हणजे फॅशन झाली आहे. अनेक युवक नशेत गाडी चालवून समोरच्या आणि स्वतःच्या जिवाशी खेळत असल्याचे विदारक दृश्य पाहावयास मिळत असून, त्यांना कायद्याचा कसलाच धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान शेतातील कामे आटोपून मी माझ्या बाजूने जेमतेम स्पीड धरून दुचाकीवरून घरी जात होतो. या वेळी पाठीमागून येणार्या दुचाकीस्वार युवकाने मला जोरात धडक दिली. त्यात माझा पाय मोडला. त्यामुळे पुणे येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे सत्तरी पार केलेल्या शरीराला प्रचंड वेदनेला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये माझी काय चूक ?
– अशोक निवृत्ती तावरे, माळेगाव, ता. बारामती.