पुणे

चोवीस तासांत दोन टीएमसीची भर खडकवासला धरण साखळीत

अमृता चौगुले

खडकवासला : वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव खोर्‍यातील संततधारेमुळे गेल्या 24 तासांत खडकवासला धरण साखळीत जवळपास पावणेदोन टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण साखळीत 12 .80 टीएमसी (44.26 टक्के) साठा झाला होता. बुधवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 11.24 टीएमसी इतके पाणी होते. गेल्या तीन, चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यालगतच्या दापसरे, तव भागात परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.

गुरुवारी दुपारी पावसाचा जोर कमी झाला. मात्र, सायंकाळी सहानंतर पुन्हा संततधार सुरू झाली. यामळे नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पानशेत धरणात सध्या 46.66 टक्के, वरसगावमध्ये 44.81, टेमघरमध्ये 29.45 व खडकवासला धरणात 55.55 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 20 जुलै रोजी धरण साखळीत 19.35 टीएमसी (66.38 टक्के) पाणीसाठा झाला होता.

टेमघर परिसरात जोरदार पाऊस
बुधवारी सकाळी सहा ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 35 तासांत टेमघर येथे 125मिलिमीटर, पानशेत येथे 73, वरसगाव येथे 72 व खडकवासला येथे 17 मिलिमीटर पाऊस पडला. पावसाचा जोर कायम राहिल्यास शुक्रवारी (दि. 21) सायंकाळपर्यंत धरण साखळीत पन्नास टक्के साठा होण्याची शक्यता खडकवासला जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT