पुणे

बारामती : बालविवाह कायद्यानुसार अधिकारी महिलेला कारावास

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल खटल्यात बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायाधीश पूजा आपटे यांनी लता वसंतराव राठोड (रा. चिंचवड, पुणे) या परिविक्षा अधिकारी महिलेस दोषी ठरवत 50 हजार रुपये दंड व सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात हिरालाल गेनबापू कदम या सामाजिक कार्यकर्त्याने फिर्याद दाखल केली होती.

राठोड या परिविक्षा अधिकारी वर्ग 3 म्हणून नाना पुठे पुणे येथील शासकीय महिला स्वीकार केंद्र येथे 22 जून 2005 ते 15 एप्रिल 2013 अखेर कार्यरत होत्या. त्यांच्याकडे बारामतीच्या महिला स्वीकार केंद्राचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यांच्याकडे दाखल असलेल्या एका मुलीच्या जन्मतारखेबाबत राठोड यांना कल्पना होती. तरीही तिचा विवाह रामभाऊ मोतीराम चौगुले (रा. गुनवडी, ता. बारामती) याच्याबरोबर झाला. वास्तविक, या मुलीला नर्सिंग करण्याची इच्छा होती.

परंतु, राठोड यांनी तुझी दुसर्‍या संस्थेत बदली करेन, अशी धमकी देत तिच्यावर विवाहासाठी जबरदस्ती केली. तिला प्रलोभन दाखवून बालविवाह लावून शासकीय कर्मचारी म्हणून अशोभनीय वर्तन केले होते. विवाहानंतर या मुलीला पुन्हा महिला स्वीकार केंद्रात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी राठोडविरोधात भादंवि कलम 506 सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. जे. सोनवणे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे आदित्य रणसिंग यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 11 (1) नुसार राठोड हिला दोषी ठरविण्यात आले. तिला 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच कलम 506 नुसार दोषी ठरवत एक महिना कारावास व दोन हजार रुपये दंड व तो न भरल्यास 8 दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षाला पी. एस. कवितके या पोलिस कर्मचार्‍याने मदत केली.

SCROLL FOR NEXT