पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेली बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीला सुरू झाली. गेल्या आठवड्यात इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृतसह अन्य भाषा तसेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, सर्वसाधारण पायाभूत अभ्यासक्रम आदी विषयांची परीक्षा पूर्ण झाली. परंतु, विद्यार्थ्यांची खरी कसोटी या आठवड्यात असून, विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित अशा विषयांच्या पेपरला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, 6 लाख 94 हजार 652 मुली, 37 तृतीयपंथी आहेत. यंदा विज्ञान शाखेतून 7 लाख 68 हजार 967, कला शाखेतून 3 लाख 80 हजार 410, वाणिज्य शाखेतून 3 लाख 19 हजार 439, व्यावसायिक अभ्यासक्रमातून 31 हजार 735, आयटीआयमधून 4 हजार 486 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यभरातील 3 हजार 373 मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे. 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान इंग्रजी विषय सोडला, तर विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या पेपरला सामोरे जावे लागले आहे.
त्यामुळे कॉपी केसेस, पेपर व्हायरल होणे, सामूहिक कॉपी आदी प्रकारच्या घटना राज्यात फारशा घडल्याचे दिसून आले नाही. परंतु, राज्य मंडळाकडून होत असलेल्या कॉपी केसेसच्या कारवाईत विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरला 42, हिंदीच्या पेपरला 16, मराठीसह अन्य भाषांच्या पेपरला 8 तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, सर्वसाधारण पायाभूत अभ्यासक्रमाच्या पेपरला 8, अशा 74 कॉपीबहाद्दरांवर राज्य मंडळाने कारवाई केली आहे. आता सोमवारी भौतिकशास्त्र, गुरुवारी रसायनशास्त्र आणि शनिवारी गणित आणि संख्याशास्त्र आदी विषयांचे पेपर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह राज्य मंडळाची देखील या आठवड्यात चांगलीच कसोटी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारावीसाठी पर्यवेक्षकाची जबाबदारी पार पाडणार्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाने यंदा केलेल्या कडक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास चांगलाच अटकाव बसला आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांमधील परीक्षेत सहभागी कर्मचार्याची बदली केल्यामुळे संबंधित शाळांमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वरदहस्त संपुष्टात आला आहे. त्यामुळे चांगली तयारी करून येण्याशिवाय विद्यार्थ्यांसमोर कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात होत असलेल्या अवघड विषयांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना तर पेपर सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य मंडळाच्या कर्मचार्यांना चांगलीच तयारी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.