गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट्ससाठी विशेष पोर्टल कार्यान्वित; संवादासह तक्रार निवारणासाठी मिळाले नवे व्यासपीठ pudhari file photo
पुणे

गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट्ससाठी विशेष पोर्टल कार्यान्वित; संवादासह तक्रार निवारणासाठी मिळाले नवे व्यासपीठ

गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाने प्रिन्सिपल इन्फ्रा प्रोजेक्टस लिमिटेडच्या सहकार्याने www.housingsocietyz.com या डिजिटल प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. हे व्यासपीठ पुण्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्या, अपार्टमेंटस आणि इमारत समूह (कंडोमिनियम) संगणकीय स्वरूपात सादर करण्यासाठी समर्पित आहे.

सर्व सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेंटसना त्यांची ओळख, रहिवासी, सांस्कृतिक उत्सव, शेजार्‍यांसाठी साहाय्यात्मक संरचना इत्यादी दर्शविण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग होईल. तसेच राजकीय, शासकीय आणि प्रशासन प्रतिनिधींशी जोडणी करून सोसायटी सदस्यांना वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवर संवाद साधता येईल आणि त्यांच्या समस्यांविषयी किंवा तक्रारी मांडता येतील.

या बाबत माहिती देताना पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन म्हणाले, आम्ही बर्‍याच काळापासून अशा प्रकारच्या ऑनलाइन पोर्टलची योजना आखत होतो. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याने आम्ही हे पोर्टल यशस्वीपणे सुरू केले आहे.

यामुळे सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि त्यांच्या सदस्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. जे सहकारी संस्थांचे एकमेकांशी सहकार्य आणि सहकारातून समृध्दी या ध्येयाशी अनुरूप आहे. आम्हाला आमचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे आणि सर्व सोसायट्या आणि अपार्टमेंटसने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

नियम व स्वयंपुनर्विकासावर 2 मे रोजी महत्त्वाची बैठक

शासनाने गृहनिर्माणचे प्रारूप नियम 15 एप्रिल रोजी जाहिर करुन सूचना, हरकती एक महिन्याच्या आत सहकार विभागाकडे दाखल करण्यासाठीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. नियम, स्वयंपुनर्विकाससह अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, समिती सभासद, सहकार विभागाचे अधिकारी तसेच या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती, आर्किटेक्ट, वकील यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, दि. 2 मे 2025 रोजी कर्वे रस्ता, एरंडवणे येथील अश्वमेध हॉल येथे सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचेही पटवर्धन यांनी सांगितले.

स्वयंपुनर्विकासावर आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट

राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी सवलती देण्याबाबत 13 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावर 24 एप्रिल 2025 रोजी शासनाच्या गृहनिर्माण विभागाने आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट गठित केला आहे. या अभ्यास गटाची कार्यकक्षाही निश्चित करण्यात आली असून, त्यांनी तीन महिन्यांत अभ्यास करून आपल्या शिफारशींसह अहवाल शासनास सादर करावयाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT