पुणे : निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीच्या द़ृष्टीने कृषी विभाग, आत्मा यंत्रणेने कृषितज्ज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्यात कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकार्यांसोबत आयोजित बैठकीत त्यांनी निर्देश दिले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सुरज मडके, कृषी उपसंचालक संजय विश्वासराव यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, आगामी तीन वर्षांत शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या द़ृष्टीने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल, करडईसारख्या पिकांचा सामूहिक पद्धतीने विकास करण्यावर भर देण्यात यावा. कालबद्ध कार्यक्रमांतर्गत प्रथम शेतकर्यांची निवड करून त्यांना कृषी विभाग आणि आत्माच्या मदतीने प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. प्रशिक्षित शेतकर्यांमधूनच गावात ‘मास्टर प्रशिक्षक’ म्हणून जबाबदारी देण्यात यावी. शेतकर्यांना लागणार्या पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विचार करून कृषी विभाग आणि आत्मा मिळून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येतील.
कालबद्ध कार्यक्रमाच्या जनजागृतीकरिता जिल्हा, तालुका व गावनिहाय सभेचे आयोजन करून शेतकर्यांना पीकपद्धती, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), पाणीबचत आदीबाबत मार्गदर्शन करावे. शेतकर्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी ‘एआय’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांची उत्पादकता वाढवून पर्यायाने उत्पादनवाढीकरिता प्रयत्न करावे, असेही डुडी यांनी सांगितले. काचोळे यांनी जिल्ह्यातील विविध भागांत उत्पादित होणार्या पिकांबाबत माहिती दिली.