पुणे: इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही राज्य सरकारने लागू केलेल्या विविध नियमावली, ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेचेच महाविद्यालय संकेतस्थळावर दिसत नाही. त्यामुळे संस्थांतर्गत कोट्यातील (इनहाउस) प्रवेशासाठीचा सुधारित नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरत आहे. त्यामुळे तो तातडीने रद्द करावा आणि पूर्वीच्याच नियमाप्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी अनेक पालकांनी पत्रकार परिषदेत केली.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत पालकांनी हिंदू महासंघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, कविता दोशी, आदिती जोशी, तृप्ती तारे, नितीन शुक्ल, तृप्ती वाकडे, अजित जोशी यांसह अनेक पालक उपस्थित होते.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. अकरावी प्रवेशाच्या शासन निर्णयामध्ये आवश्यक बदल करण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पालक आघाडीला सकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र, 3 जूनपर्यंतच प्रवेश प्रक्रियेची मुदत असल्यामुळे पालक आघाडी मागणीबाबत आक्रमक राहणार आहे. सीईटीप्रमाणे प्रवेशप्रक्रिया सुलभ असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अडचणी येत आहेत. प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याकरिता असलेले संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळेचेच महाविद्यालय संकेतस्थळावर दिसत नाही. घरापासून जवळ असलेले महाविद्यालय देखील संकेतस्थळावर दिसत नाही. महाविद्यालयात असलेला प्रशासकीय जागा देखील शासकीय जागा सरकारकडे जमा झाल्याने महाविद्यालयांकडे पर्याय शिल्लक नाही.
या सर्व अडचणीमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक देखील चिंताग्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले असले, तरी प्रवेश प्रक्रियेमुळे चांगले महाविद्यालय मिळण्याची खात्री उरलेली नाही. परिणामी पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे कविता दोशी यांनी या वेळी सांगितले.
‘या विषयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलणे झाले आहे. बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी सकाळपर्यंत या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, 3 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत असल्याने तोवर निर्णय न झाल्यास हिंदू महासंघाकडून राज्यभर पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणार आहे’, असा इशाराही महासंघाचे दवे यांनी यावेळी दिला.