खडकवासला: सिंहगड रस्ता परिसरातील खडकवासला, धायरी, नांदेड या भागांतील जीबीएस (गुलेन बॅरी सिंड्रोम) रोगाच्या साथीचे पडसाद विधानसभा अधिवेशनात उमटले. आमदार भीमराव तापकीर यांनी याबाबत लक्षवेधी मांडली.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी नियमित पाण्याची तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा, संशयित रुग्णांवर उपचार आदी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेला दिले.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या रोगाची साथ सुरू झाल्याचे स्पष्ट करत पाण्याच्या शुद्धीकरणात प्रशासनाचा हालगर्जीपणा झाल्याचे या वेळी तापकीर यांनी नमूद केले. फेब्रुवारी महिन्यात राज्यात जीबीएस रुग्णसंख्या दोनशेपेक्षा अधिक झाली होती.
त्यात सर्वाधिक रुग्ण खडकवासला विधानसभा मतदारसंघात आढळून आले होते. या रोगाची साथ पुन्हा या भागात सुरू होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी या वेळी तापकीर यांनी केली.