पुणे

पुणे : ऊसतोड कामगारांच्या बालकांचे लसीकरण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऊसतोड मजूर हे साखर कारखाना सुरू असण्याच्या कालावधीपुरतेच कार्यक्षेत्रात राहतात. यामुळे त्यांच्या बालकांचे नियमित लसीकरण होऊ शकत नाही. गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांच्या बालकांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यासाठी साखर कारखान्यांवरील मजुरांच्या झोपड्यांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम आरोग्य विभागातर्फे हाती घेण्यात आली आहे. पुणे मंडळांतर्गत पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांत सद्यस्थितीत 66 साखर कारखाने सुरू आहेत.

या साखर कारखान्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सर्वेक्षणासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. सर्वेक्षणात 371 गरोदर माता व 0 ते 5 वर्षे वयोगटातील 2424 बालकांची आरोग्य तपासणी आणि लसीकरण करण्यात आले. गोवर रुबेला नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी 126 विशेष लसीकरण सत्रे आयोजित करून 364 गोवर रुबेला लसीचा पहिला डोस व 485 बालकांना गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस असे एकूण 849 वंचित बालकांचे गोवर रुबेलासाठी लसीकरण करण्यात आले.

बालकांना अ जीवनसत्त्वाचा डोसदेखील देण्यात आला. या कालावधीत 371 मातांना विविध आजारांसाठी उपचार व लसीकरण करण्यात आले. तसेच 108 बालकांना बीसीजी, 105 बालकांना पोलिओचा जन्मवेळेचा डोस 174 बालकांना पोलिओचा प्रथम डोस, 122 बालकांना द्वितीय 107 बालकांना तिसरा डोस, तर 236 बालकांना बुस्टर डोस देण्यात आला. विशेष सत्रांमध्ये माता व बालके सोडून अन्य 2190 पुरुष व 2163 महिला अशा एकूण 4353 मजुरांची तपासणी करून उपचार करण्यात आले. कारखान्यावरील या विशेष सत्रांमध्ये 5573 माता, बालके, पुरुष व स्त्रियांची तपासणी, उपचार व लसीकरणाच्या सेवा देण्यात आल्या.

SCROLL FOR NEXT