पुणे: राज्यात केवळ कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. उर्वरित मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस काही भागात पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात गुरुवार (दि. 3) ते शनिवार (दि. 5 जुलै) दरम्यान कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. हवामान तज्ज्ञांच्या मते, 11 जूननंतरच हवेचे दाब राज्यात अनुकूल होणार आहेत. त्यानंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
सावंतवाडीत मुसळधार; कणकवली तालुक्यात धुवाँधार
सावंतवाडी तालुक्यात गेल्या 24 तासांपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. दरम्यान, कणकवली तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे.