पुणे: शहरातील वृक्षसंपदा जपण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्याच कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून पु. ल. देशपांडे उद्यानातील झाडांची बेकायदा तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तोडलेल्या झाडांचे लाकूड रात्री टेम्पोतून कोंढव्यातील वखारीकडे नेले जात असताना एका नागरिकाने पाठलाग करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी महापालिका कर्मचारी विकास आटोळे, तुकाराम कुंडगीर आणि अन्य तीन जणांविरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २८ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात घडली. तन्मय बाबर हे सहकाऱ्यासोबत खडकवासला येथून महर्षीनगरकडे जात होते. त्यावेळी उद्यानाच्या परिसरात एका टेम्पोमध्ये तोडलेल्या झाडांचे लाकूड भरले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने बाबर यांनी संबंधित टेम्पोचा पाठलाग केला.
टेम्पो थांबवून लाकूड कुठून आणले, अशी विचारणा केली असता ते एका सोसायटीमधून आणल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, लाकूड उद्यानातील असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर टेम्पोमधील व्यक्तींनी समाधानकारक माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बाबर यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता पु. ल. देशपांडे उद्यानातील झाडे तोडून हे लाकूड नेले जात असल्याचे समोर आले. तुकाराम कुंडगीर याने सिंहगड रस्ता परिसरातील उद्यान मिस्त्री विकास नानासाहेब आटोळे यांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचे आणि लाकूड कोंढव्यातील वखारीत नेण्यात येत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.
त्यानंतर बाबर यांनी आटोळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी झाडे तोडण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले; मात्र, पुढील संभाषणात झाडे तोडण्याची सूचना आपणच दिल्याचे मान्य केल्याचा दावा बाबर यांनी तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरी आणि कलम ३२४(३) अन्वये मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पर्वती पोलिस करीत आहेत. महापालिकेच्या उद्यानातील झाडांची रात्री तोड होऊन लाकूड वखारीपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाल्याने उद्यानांच्या सुरक्षा आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोषींवर कठोर कारवाई करा : श्रीनाथ भिमाले
पु. ल. देशपांडे उद्यानातील वृक्षतोड व लाकूड चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व महापालिकेच्या उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले.