पुणे : राज्यात वाळू आणि इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी परिवहन विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट परवाना निलंबन आणि वाहन जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या तिन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात ही कार्यवाही सुरू करण्यात आली असून तस्करांचे धाबे दणाणले आहेत. (Latest Pune News)
राज्यात वाळू आणि इतर गौण खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, नदीपात्रांचे स्वरूप बदलत आहे, तसेच पुलांच्या आणि बंधाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. अनेकदा अवैध वाळू वाहतुकीत सामील असलेली जड वाहने रात्रीच्या वेळी बेदरकारपणे रस्त्यांवर धावताना गंभीर अपघात घडवतात. अशा अपघातांमुळे अनेकांचे जीव गेले असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल आणि वन विभागाच्या ’महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, 2013 अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईला आता परिवहन विभागाकडूनही प्रभावी साथ मिळणार आहे.
परवाना नियमांचे उल्लंघन करून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट विभागीय कारवाई करण्यात येईल. राज्य परिवहन प्राधिकरणाकडून वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसायाला चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गुन्ह्याचा प्रकार कारवाई
पहिला गुन्हा - 30 दिवस परवाना निलंबित, वाहन अटकाव
दुसरा गुन्हा - 60 दिवस परवाना निलंबित, वाहन अटकाव
तिसरा गुन्हा - वाहन जप्त करून परवाना रद्दची कारवाई
राज्य परिवहन प्राधिकरणाकडून वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसायाला चाप बसणार आहे. या कारवाईत दोषी वाहन जप्त करून परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे.स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे