पुणे

हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री; पुणे ते सोलापूर महामार्गावरील प्रकार

अमृता चौगुले

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ ते भिगवण यादरम्यान अनेक हॉटेलमध्ये बेकायदेशीर अवैध दारू विक्री जोमात सुरू असून, अशा दारू विक्रीला आशीर्वाद नेमका कोणाचा आहे? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. स्थानिक पोलिसांची उदासीनता आणि राज्य उत्पादन खात्याच्या दुर्लक्षामुळे महामार्गावर अवैध दारू विक्रीत  सर्रास वाढ होत आहे. महामार्गावरील अनेक हॉटेल, ढाब्यांमध्ये देशी-विदेशी दारू सहज मिळत असल्याने हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात.

दारू पिणार्‍यांची संख्या वाढत असल्याने भांडणाचे प्रकार वाढून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे चित्र सध्या या महामार्गावर घडत आहे. महामार्गाकडेच्या अनेक हॉटेलमध्ये चोवीस तास सहज दारू उपलब्ध होत असल्याने अनेक युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी कामगार या दारूवर खर्च करीत आहेत. अशा या अवैध दारू विक्रीविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी महिला व नागरिकांमधून होत आहे.

मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली या परिसरातील हॉटेल व ढाबा व्यावसायिक याच कारणाने रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालू ठेवत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असून, गस्त करणारी पोलिस यंत्रणा आर्थिक चिरीमिरीमुळे व्यावसायिकांवर कारवाई करताना दिसत नाहीत. याबाबत दौंड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रवीण पोळ यांच्याशी संपर्क साधला असता महामार्गावरील हॉटेलवर चालणार्‍या अवैध दारू विक्रीप्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT