उमेश काळे
टाकळी भीमा : शिरूर तालुक्यात सावकारकीचे जाळे घट्ट बनत असून, यामधून पिळवणूक झाल्याने अनेक कुटुंब मेटाकुटीला आली आहेत. तर अनेकांनी सावकारांचा धसका घेतला आहे. व्यावसायिक सावकारीच्या जाचाला कंटाळून हतबल झाले आहेत.(Latest Pune News)
व्यवसायाच्या गरजा आणि कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी बँका, पतसंस्था यांच्याकडे वारंवार हेलपाटे मारूनही कर्ज मिळत नाही. याचा फायदा अवैध सावकारांना होतो. या सावकारांच्या जाळ्यात अनेक लहान-मोठे व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, कामगार अडकले आहेत. त्यातच सावकारांविरोधात कडक कारवाई होत नसल्याने संबंधित मंडळी तक्रारीसाठीही पुढे येत नसल्याचे चित्र शिरूरमध्ये आहे. परिणामी, सावकारांकडून कर्जदारांना शिवीगाळ करणे, त्यांची जमिनी, घरे, शेती, दुकाने नावावर करून घेतली जात आहेत.
कमी भांडवलात मोठा फायदा होत असल्याने तालुक्यातील अनेक गावात लहान-मोठे बेकायदेशीर सावकार तयार झालेले आहेत. त्यातच कडक कारवाईचे कमी प्रमाण पाहता हा सावकारकीचा व्यवसाय तेजीत आल्याचेही दिसून येते. हे सावकार आर्थिक गरज पाहून नागरिकांचा व्याजाच्या माध्यमातून छळ करतात.
सावकार स्वतः व्याजाने पैसे देतात, तर काहीजण इतरांना पुढे करून कमिशनवर सावकारकी करतात. यामध्ये आव्वाच्या सव्वा व्याज वसून केले जाते. सावकारांचे मासिक व्याज सर्वसाधारण 10 ते 12 टक्क्यापर्यंत आहे. वेळेवर व्याज मिळाले नाही तर पुढे मासिक व्याज वाढत जाते. सावकारी व्यवसायात अधिक तर व्यवहार तोंडी मध्यस्थांमार्फत केले जातात. किंवा जास्त भावाची जमीन फक्त खरेदी खताची किंमत दाखवून दस्त केला जातो. त्या बदल्यात पैसे दिले जातात. तसेच घर, जमीन, दुचाकी, चारचाकी आणि दागिने यावर सावकारांचा जोर जास्त दिसून येत आहे.
शेअर मार्केट, महागडे मोबाईल, महागड्या गाड्या, चैनीच्या वस्तू, ऑनलाइन गेम आदीच्या आहारी तरुण मुले गेली आहेत. यासाठी किंवा यातून झालेले कर्ज फेडण्यासाठी तरुण सावकारांचा आधार घेतात. त्यानंतर त्यांच्या व्याजाच्या जाळ्यात अनेक तरुण अडकले. पैसे परत देताना होत असलेल्या त्रासातून काहींनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
सावकारांविरोधात तालुक्यातून 72 तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार 7 सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहे, तसेच अनेक प्रकरणी सुनावण्या चालू आहेत. बेकायदेशीर सावकारांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास त्यांनी सहाय्यक निबंध कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार द्यावी.दीपक वराळ, सहकार अधिकारी श्रेणी वर्ग 2, सहाय्यक निबंध कार्यालय शिरूर