पुणे: साहेब, संपूर्ण देशातील प्रदूषणाचे आकडे आम्हाला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनच मिळतात. मात्र, त्यांची आकडेवारी सदोष असते. त्यामुळे प्रदूषणाचे विश्लेषण करताना आमची ’तारेवरची कसरत’ होते. त्यांची आकडेवारीच सदोष असल्याने आम्ही अंदाज द्यायचे कसे? हे हतबल उद्गार आहेत पुणे शहरातील पाषाण भागातील ’सफर’ या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणार्या ’आयआयटीएम’ या संस्थेतील हवामानतज्ज्ञांचे. (Latest Pune News)
पुणे शहरातील पाषाण भागात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत चालणारी आयआयटीएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) ही संस्था आहे. त्याच संस्थेचे ‘सफर’ (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड अर्ली वॉर्निंग सिस्टिम) हा विभाग आहे. ‘सफर’ची टीम ही देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या प्रामुख्याने चार अतिप्रदूषित शहरांतील हवाप्रदूषणाचा अहवाल दर मिनिटाला संकेतस्थळावर देत असते. याची पाहणी करण्यासाठी नुकतेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन पुणे शहरात आले होते. ते स्वतः पुण्यातील याच संस्थेत 1988 ते 1997 अशी दहा वर्षे हवामानशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. सध्या ते 2021 पासून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्यासमोरच येथील शास्त्रज्ञांनी ‘पॉवर पाइंट प्रेझेंटेशन’ देत हवाप्रदूषणावर सादरीकरण केले. मात्र, दिल्लीच्या प्रदूषणाचा विषय पुढे येताच शास्त्रज्ञांनी आपली हतबलताच बोलून दाखवली. ‘सफर’चे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेला हा संवाद डोळे उघडणारा आहे.
पुणे शहरात पाषाण भागात देशातील दिग्गज हवामान शास्त्रज्ञांची मोठी टीम आहे. या संस्थेत दोन महासंगणक असून, त्यावर जागतिक दर्जाचे काम होते. नुकतेच या संस्थेने भारतीय प्रणालीचे हवामानचे हवामान मॉडेल देशाला दिले. त्यामुळे ही संस्था जगात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सार्क देशांतील हवामान शास्त्रज्ज्ञ प्रशिक्षणासाठी येतात. या संस्थेत देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या महानगरांतील हवा प्रदूषणाचे अपडेट दर सेकंदाला देत असते. या चारही शहरांतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांसह हवेतील घातक वायुप्रदूषणाबाबत दररोज सविस्तर अहवाल दिला जातो. दररोजच्या धूलिकण प्रदूषणासह या चारही शहरांतील दिवाळीतील फटाक्यांमुळे झालेले प्रदूषणही ही संस्था नोंदवत असते.
हवेतील जे घातक वायू आहेत त्यांची मोजणी करणारी अद्ययावत प्रयोगशाळा पुण्यातील पाषाण भागातील आयआयटीएम या संस्थेत उभारण्यात आली. त्याचे उद्घाटन पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. रविचंद्रन यांनी केले. या प्रयोग शाळेला वायुमंडलीय रासायनिक प्रयोगशाळा असे नाव देण्यात आले असून, आता येथून हवेतील प्रदूषित वायूंचा अभ्यास अधिकच सूक्ष्म पद्धतीने केला जाणार आहे. आयन एक्चेंज क्रोमॅटोग्राफीसह अनेक अद्ययावत यंत्रांद्वारे प्रदूषित वायूंचा अभ्यास केला जाणार आहे. या प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. चैत्री रॉय यांनी त्याची माहिती या वेळी सर्वांना दिली.
या संस्थेत दोन महासंगणक असून, त्यावर हवामानाचे संशोधन होते. मात्र, यात देशभरातील प्रदूषणाची आकडेवारी देण्याचे काम हे स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी आणि सीपीसीबी) यांनी दिलेल्या आकडेवारीवर येथील शास्त्रज्ञ हवा प्रदूषणाचे अंदाज देतात.
याच ठिकाणी शास्त्रज्ञांनी खास दाट धुक्याचा अंदाज देणारे जगातील सर्वोकृष्ट वायफेक्स नावाने एक मॉडेल तयार केले. त्याचे उद्घाटनही डॉ. रविचंद्रन यांनी केले. खास करून उत्तर भारतात हिवाळ्यात विमानांसह रेल्वे आणि इतर वाहनांचे अपघात टाळण्यासाठी हे मॉडेल आता काम करणार आहे. त्याची अचूकता 85 टक्के असल्याचा दावा येथील शास्त्रज्ञांनी केला आहे.