पुणे: हिमालयातील हिमनद्या वेगाने का वितळत आहेत? येथील नद्यांमध्ये काळ्या कार्बनचे वाढते प्रमाण नेमके किती आहे? याचा अभ्यास पुण्यातील हवामानतज्ज्ञ करीत आहेत. आयआयटीएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम नुकतीच पूर्ण केली. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) पुणे येथील शास्त्रज्ञांनी हिमालयातील हिमनद्या (ग्लेशियर) मोहिमेचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. 'मेगा सिटीज एअर क्वालिटी अँड वेदर सर्व्हिसेस' प्रकल्पांतर्गत ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचा उद्देश काय होता..?
उत्तराखंडमधील हिमनद्यांच्या वितळण्यावर होणाऱ्या हवामानबदलांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळण्यामागे जागतिक तापमानवाढ आणि प्रादेशिक हवामानातील बदल कसे कारणीभूत ठरत आहेत, याचे संशोधन करणे. कार्बन आणि इतर प्रकाश शोषून घेणाऱ्या कणांचा (एरोसोल) हिमनद्यांवर होणारा परिणाम तपासणे. पर्वतीय क्षेत्रातील हवामान आणि वातावरणीय बदलांचा अचूक अंदाज लावण्यासाठी पायाभूत डेटा गोळा करणे. ही मोहीम मे आणि जून या महिन्यांत दोन दुर्गम भागांत राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात गंगोत्री-गोमुख-तपोवन हे भाग, तर दुसऱ्या टप्प्यात अलकनंदा खोऱ्यातील सतोपंथ ग्लेशियर क्षेत्राचा (४ हजार मीटर उंचीवर) अभ्यास करण्यात आला. वातावरणातील घातक कणांचे
मोजमाप करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 'एथॅलोमीटर'सारख्या आधुनिक यंत्रांचा वापर केला. भोजबासा येथे ३ हजार ५०० मीटर उंचीवर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्यात आले; जेणेकरून सतत डेटा मिळत राहील. शास्त्रज्ञांच्या पथकाने बर्फ आणि हिमनद्यांचे थेट नमुने गोळा केले. ज्यांचे प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण केले जाईल.
या महत्त्वपूर्ण मोहिमेचे नेतृत्व आयआयटीएम पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अभिलाश पणिकर आणि डॉ. सचिन घुडे यांनी केले. हिमालयातील बर्फ वितळल्यास देशातील नद्यांच्या पाणीपातळीवर आणि मान्सूनवर मोठा परिणाम होऊ शकतो. या मोहिमेतून समोर येणारे निष्कर्ष भारताच्या जलसुरक्षा आणि पर्यावरण धोरणासाठी अत्यंत दिशादर्शक ठरणार आहेत.
आम्ही सलग दोन महिने दोन टीमने हिमालयातील सुमारे चार हजार मीटर उंचीवर जाऊन तेथील हिमनद्यांचा अभ्यास केला. प्रामुख्याने बार्फाळ भागात काळा कार्बन किती जमा होत आहे, याची निरीक्षणे घेतली. त्या बर्फाचे नमुने गोळा केले. त्यावर सखोल अभ्यास आमच्या प्रयोगशाळेत सुरू असून, त्याची निरीक्षणे नोंदवण्यास थोडा कालावधी लागेल.डॉ. अभिलाष पणिकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटीएम, पुणे