बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : अप्पर डेपो ते कोंढवा रस्त्यावरील महापालिकेच्या विविध विकासकामांत विविध खात्यांच्या अधिकार्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनसुद्धा रस्त्यातील मूळ प्रश्न तसाच राहिला आहे. महापालिकेतील ड्रेनेज विभाग, पाणीपुरवठा विभाग, पथविभाग यांचा या कामांशी प्रत्यक्ष संबंध असताना सुद्धा सिमेंट काँक्रीटचा रस्ता करताना सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्या टाकल्या गेल्या नाहीत.
या परिसरातील रस्त्यांमध्ये डबकेच निर्माण होते. परिणामी वाहनचालक, पादचारी यांना धडपणे चालता येत नाही. महापालिका अधिकार्यांशी यासंदर्भात विचारणा केली असता, हे काम त्या विभागाचे आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. सिमेंट काँक्रीट करायचा रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज लाइन व पिण्याच्या पाण्याची लाइन, पावसाळी लाइन रस्त्याच्या बाजूने करणे गरजेचे आहे. तसे न करता काँक्रीटचा रस्ता झाल्यानंतर मधोमध रस्ता फोडून नव्याने ड्रेनेज लाइन घालण्याचा घाट घातला आहे. पूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत असे या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे.
जगताप डेअरी परिसरातील या रस्त्यावर सतत पाणी साठत होते. यापूर्वी या ठिकाणी पावसाळी लाइन नव्हती, आता नव्याने टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील पाण्याचा निचरा होऊन पाणी सरळ व्यवस्थित जाईल. यापुढे रस्त्यात पाणी साठणार नाही.
– आदिल तडवी, उपअभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका.