पुणे

नारायणगाव : सरपंच सुशिक्षित असला तर गावचा विकास: आ. अतुल बेनके यांचे मत

अमृता चौगुले

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: 'गावचा सरपंच हा जर सुशिक्षित असेल व त्याला शासनाच्या योजनांबद्दल अचूक माहिती असेल, तर तो गावचा सर्वांगीण विकास करू शकतो,' असे मत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले. नुकतीच जुन्नर तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार नारायणगाव येथे त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी सर्व विजयी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना आमंत्रित केले होते. त्यांना फेटा बांधून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या 38 ग्रामपंचायतींपैकी 28 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, यामध्ये आदिवासी भागातील 22 ग्रामपंचायतींपैकी 19 ग्रामपंचायती या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. परंतु, आमदार अतुल बेनके यांनी सरपंच हा कुठल्या पक्षाचा आहे, हे न पाहता तो गावचा विकास करणारा केंद्रबिंदू आहे, असे लक्षात घेऊन सर्वांना निमंत्रित केले होते.

आ. बेनके म्हणाले, की गावचा सरपंच हा सुशिक्षित असेल व त्याला शासकीय योजनांचा अभ्यास असेल, तर गावच्या विकासासाठी कोणत्या फंडातून किंवा कोणत्या योजनेतून कसे पैसे आणायचे, हे त्याला ठाऊक असते. यासाठी तो गावाच्या अंतर्गत येणारे रस्ते हे कशा अंतर्गत येतात, त्यासाठी निधी कोणत्या योजनेतून उपलब्ध केला जाऊ शकतो, याचा अभ्यास व त्याचा वापर करून तो गावचा विकास करू शकतो. दरम्यान, 5 ऑक्टोबरनंतर तालुक्यातील सर्व सरपंचांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

SCROLL FOR NEXT