लेझर बीम लाइट File photo
पुणे

Pune News | लेजर लाइट लावल्यास डीजे जागेवरच जप्त करणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : लेजर लाइट या वेळी मिरवणुकीत दिसणार नाही, ही आमची शंभर टक्के हमी आहे. जर त्यानंतर देखील कोणी डीजेवर लेजर लावले तर जागेवरच लेजरसह डीजे जप्त करून पोलिस गुन्हे दाखल करतील, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. बुधवारी (दि. ११) सायंकाळी अमितेश कुमार यांनी दैनिक 'पुढारी'च्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. दरम्यान, शहरात डीजेवर लेजर लाइटचा वापर केल्याप्रकरणी नुकतेच पोलिसांनी दहा

जणांवर गुन्हे दाखल करून लेजर लाइट जप्त केली आहेत. त्यामुळे पोलिसांनी लेजर लाइटच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. 'गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवर लावण्यात येणाऱ्या लेजर बीम लाइटवर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या लाइटमुळे मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, त्यानंतर देखील कोणी लेझर बीम लाइट लावल्यास कडक कारवाई करण्यात येईल,' असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. अमितेश कुमार म्हणाले, यंदा मिरवणुकीत कोणी डीजेवर लेजर लाइट लावणार नाही. ही आमची शंभर टक्के पुणेकरांना हमी आहे. त्यानंतरदेखील कोणी लेजर लाइट लावल्या, तर पोलिस थातुरमाथूर कारवाई न करता, लेजर लाइटसह जागेवरच डीजे जप्त करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लेजर लाइट दिसणार नाहीत.

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटामुळे काही नागरिकांना बहिरेपणाची समस्या उद्भवली आणि काहींना हृदयविकाराचे झटके आल्याच्याही घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी आतापासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. डीजेचा मिरवणुकीतील वापर, न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाच्या मर्यादा याबाबत पोलिस 'डीजे' व्यावसायिकांशी चर्चा करणार असल्याचेही आयुक्त म्हणाले. याबाबत लवकरच पोलिस डीजे व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना सूचना देणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT