बारामतीत दुसरा कोणी आमदार झाला तर माझी किंमत कळेल : अजित पवार File Photo
पुणे

बारामतीत दुसरा कोणी आमदार झाला तर माझी किंमत कळेल : अजित पवार

सोनाली जाधव

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामतीसाठी मोठ्या प्रमाणावर कामे करूनही निवडणुकीत गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची. मी पहिल्यापासून लाखाच्या मताधिक्याने निवडून येत होतो. मीसुद्धा आता ६५ वर्षांचा झालो, आता समाधानी आहे. जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही.

मी सोडून दुसरा कोणी तरी आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे

मी सोडून दुसरा कोणी तरी आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे. मग तुम्ही माझी १९९१ ते २०२४ या कालावधीतील तुलना त्यांच्याशी केल्यावर काय ते लक्षात येईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

येथील राष्ट्रवादी भवनात रविवारी (दि. ८) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, बारामतीत न सांगता रस्ता होतोय. ७५० कोटींच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. एक हजार कोटी रुपयांचे मेडिकल कॉलेज उभारले, त्याला तुमच्या मागणीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. मेडदला म्हाडाच्या जागेत भव्य आयुर्वेद कॉलेज होत आहे. अॅड. केशवराव जगताप यांच्या मागणीप्रमाणे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सर्व रस्ते डांबरी करून दिले. बारामती शहरातील साठवण तलाव ते जळोची असे निरा डावा कालव्याचे लायनिंग केले.

दादागिरी खपवून घेणार नाही

आमराई भागात घर बांधणीचा कार्यक्रम राबवला. बारामतीतील जास्तीत जास्त दिदींना लखपती करण्याचा मानस आहे. जुनी भाजी मंडईचा परिसर बदललेला दिसेल. मळदपासून मेडदपर्यंत नदी सुधार प्रकल्प राबवला. जिल्ह्यात नाही असा शादीखाना बारामतीत उभा केला. अनेक कामे केली. त्यासाठी मी सकाळपासून कामाला सुरुवात करतो. आता माझ्या लवकर उठण्याची काही जण चेष्टा करतात, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. ... तर मोक्का लावू

मी कुणाची दादागिरी खपवून घेणार नाही. माझ्या जवळचा कार्यकर्ता असला आणि चुकला तर मोक्का लावायला मी मागे पुढे पाहणार नाही, असा सज्जड इशारा पवार यांनी दिला.

अर्थ खात्यावर बोलणाऱ्याला बोलू द्या

शरद पवारसाहेबांनी कधी अर्थ खाते स्वतःकडे ठेवले नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदासह अनेक पदे भूषवली. मंत्रिपद माझ्याकडे आल्यानंतर मी अर्थ खाते घेतले. त्यातून निधी कसा आणता येईल याचा विचार केला. अर्थ खात्यावर कुणीतरी काहीतरी बोललं, बोलणाऱ्यांना बोलू द्या, तुम्ही त्यात लक्ष घालू नका, आम्ही तिकडे बघू, असा टोलाही त्यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांना लगावला.

बटण दाबायचं लोकांच्या हातात

गत आठवड्यात खा. सुनील तटकरे बारामतीत आले होते. ते म्हणाले, बारामतीचे तुम्ही हे काय केले आहे? काम केलं तरी असं कसं होतं? मी म्हणालो, मला माहिती नाही, काम करायचं आपल्या हातात आहे. बटण दावायचं लोकांच्या हातात. जिथे मी दुसऱ्याला खासदार, आमदार करतो तिथे जर अशी परिस्थिती होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची असे म्हणत अजित पवार भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT