उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही न्यायालयीन, राज्य सरकार माध्यमातून यापूर्वी लढा दिला आहे. भविष्यकाळात सभासदांनी संधी दिल्यास यशवंत कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास व्यक्त करून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला सभासदांनी संधी द्यावी, असे आवाहन आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप यांनी केले आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेलच्या सांगता प्रचार सभेत पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप बोलत होते.
या वेळी सभेसाठी जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, हवेली बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ पठारे, प्रताप गायकवाड, माणिकराव गोते, कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, पॅनेलप्रमुख बाळासाहेब चौधरी, प्रशांत काळभोर, कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे, बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, नंदू काळभोर, सचिन तुपे, सागर चौधरी तसेच सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रकाश जगताप म्हणाले, बाजार समिती, जिल्हा बँक या निवडणुकांमध्ये आम्हाला तालुक्याने संधी दिली आहे. तीच संधी कारखान्यात दिली तर आम्ही निश्चित कारखाना सुरू करण्यास कटिबद्ध आहोत. सत्ता मिळाल्यास साडेबाराशे टनी अत्याधुनिक कारखाना, कामगार व सभासदांची थकीत देणी उभी करण्यासाठी वित्तीय संस्था अथवा बाजार समितीच्या ठेवींतून जमिनीची विक्री करण्याचा आमचा मानस आहे.
आम्ही घराणेशाही वाढविण्यासाठी नाही, तर कारखाना सुरू करण्यासाठी कटिबद्ध असून सभासदांनी खर्या शेतकरी पुत्रांना संधी देण्याचे आवाहन प्रकाश जगताप यांनी केले आहे. प्रशांत काळभोर म्हणाले, कारखाना भविष्यात चालू होण्यासाठी निवडणूक बिनविरोध करणे आवश्यक होते. मात्र आपल्या घरातील मंडळी कारखान्यावर जावी व त्यांची पुढची पिढी कारखान्यात शिरावी म्हणून अट्टाहासाने निवडणूक लावली गेली. परंतु कारखाना निवडणुकीत ही मंडळी मागील काळात कारखाना बंद कसा झाला?, एक लाख पोत्यांची विक्री परवानगी घेऊन साडेचार लाख पोती कोणी विकली?, खरेदी-विक्री संघाची किती जागा विकली?, अडीच हजार टनांचा हा कारखाना विस्तारीकरण करून काय साधले? या प्रश्नांची उत्तरे प्रचाराचा काळात देत नाहीत.
उलट खालच्या भाषेत जाऊन वैयक्तिक टीका -टिप्पणी करणे इतकाच अजेंडा पुढील पॅनेलचा आहे. आम्ही कारखाना बंद पाडल्याचे पुराव्यानिशी मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे जे जबाबदार आहेत ते कारखाना कसा सुरू करतील, असा प्रश्न प्रशांत काळभोर यांनी उपस्थित केला. प्रचार सांगता सभेस विकास दांगट, पांडुरंग काळे, माणिकराव गोते, संतोष कुंजीर, चित्तरंजन गायकवाड, आण्णा महाडीक, जितेंद्र बडेकर, संतोष कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा