पुणे

पुणे : कमला नेहरूमधील ‘आयसीयू’ सामान्यांच्या आवाक्याबाहेर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तब्बल 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महापालिकेच्या रुग्णालयात केवळ एकच अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. आयसीयूचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असून, आता रुग्णांकडून डिपॉझिटची मागणी केल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाने या वृत्तास नकार दिला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयू विभाग नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला. आयसीयू खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आले.

आयसीयूसाठी सीजीएचएसहून 1 टक्का कमी दर आकारले जात असले, तरी एका दिवसाचे शुल्क 4 हजार ते 5 हजार रुपये इतके आहे.
रात्री-अपरात्री रुग्णांना तातडीने अ‍ॅडमिट होण्याची गरज भासल्यास 40 हजार रुपये डिपॉझिट मागितले जात असल्याची तक्रार आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

महापालिकेने आरोग्य सेवांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. तपासण्यांपासून उपचारांपर्यंत सर्वत्र नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. गरीब रुग्णांची ससेहोलपट थांबविण्यासाठी आयसीयूमधील ठरावीक खाटांचे हक्क महापालिकेने स्वत:कडे राखीव ठेवावेत, अशी अपेक्षा आमदार सुनील कांबळे यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली. खासगी संस्थेशी केलेल्या करारनाम्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

आयसीयू निविदांना मिळेना प्रतिसाद
कमला नेहरू रुग्णालयापाठोपाठ शिवाजीनगरमधील डॉ. दळवी प्रसूतिगृह आणि माळवे दवाखाना येथे आयसीयू सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. मात्र, सीजीएचएसहून 1 टक्का कमी दराने आयसीयूचे दर ठरविल्याने निविदांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT