अंटार्क्टिका Pudhari
पुणे

अंटार्क्टिकातील बर्फ वेगाने वितळतोय, हिमवादळेही वाढली

आशिष देशमुख

ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम अंटार्क्टिकात गेल्यावर जास्त जाणवतो. कारण, तेथील बर्फ वेगाने वितळतोय तसेच तेथे हिमवादळेही वाढली आहेत, असे निरीक्षण नोंदविले आहे. पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञांसह उद्या शनिवारी (दि. 19 ऑक्टोबर) देशभरातील शास्त्रज्ञांची टीम अंटार्क्टिकात संशोधनासाठी निघणार आहे. त्याचे नेतृत्व आयएमडी पुणेचे हवामान शास्त्रज्ञ रवींद्र मोरे हे करणार आहेत.

पृथ्वीवरचा दक्षिण ध्रुव म्हणून अंटार्क्टिकाची ओळख आहे. तेथे भारत सरकारच्या वतीने शास्त्रज्ञांची पहिली तुकडी 1981-82 या वर्षात गेली. त्यानंतर भारताने आपले पहिले संशोधन केंद्र उभे केले. त्यानंतर आजवर एकूण 44 मोहिमा अंटार्क्टिकावर भारतीय शास्त्रज्ञांनी केल्या, यात हवामान विभागासह विविध विज्ञान संस्थांतील शास्त्रज्ञ या ठिकाणी जात आहेत. तेथील हवामान, जीवसृष्टीचा अभ्यास करून शास्त्रज्ञ परत येतात. त्यांच्या मते ग्लोबल वॉर्मिंगचा स्पष्ट परिणाम अंटार्क्टिकात पाऊल ठेवताच दिसतो. तेथील हिमावादळे वाढली असून, बर्फही वेगाने वितळत आहे.

तीन महिन्यांचा दिवस अन् रात्र

पुण्यातील हवामानशास्त्रज्ञ रवींद्र मोरे या मोहिमेवर चारवेळा गेले आहेत. ते पाचव्यांदा जात असून, यंदा ते 24 शास्त्रज्ञांच्या तुकडीचे टीमलिडर आहेत. त्यांच्यासोबत याच विभागातील प्रमोद मेहेत्रे हे दुसरे हवामानशास्त्रज्ञ जाणार आहेत. मोरे यांनी सांगितले की, अंटार्क्टिकावर तापमान उणे 10 ते उणे 35 अंश सेल्सिअस इतके असते. सुमारे तीन महिन्यांचा दिवस, तर तीन महिन्यांची सलग रात्र असते. 17 नोव्हेंबरपासून तेथे दिवस सुरू होणार आहे. त्यामुळे आम्ही 17 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी जाणार आहोत.

40व्या मोहिमेत पाहिली16 हिमवादळे

मोरे यांनी सांगितले की, मी 40 व्या मोहिमेत जेव्हा गेलो तेव्हा 16 हिमवादळे तेथे पाहिली. त्याला शास्त्रीय भाषेत ब्लिझर्ड असे म्हणतात. एक वादळ किमान तीन तास सुरू राहते. कधी कधी ते सलग दहा ते अकरा दिवस सुरूच राहते. अशावेळी बेस कॅम्पवरून बाहेर पडणे धोक्याचे असते. अशा वेळी शास्त्रज्ञ साखळी करून बाहेर पडतात अन् मगच संशोधन करणे शक्य होते. सन 2011 मध्ये आम्ही 28 हिमवादळे पाहिली. त्या वर्षी तेथील किमान तापमान उणे 33 अंश इतके खाली गेले होते. तेथे वार्‍याची गती ताशी 160 ते 192 किमीपर्यंत जाते.

भारताचे एक केंद्र बर्फाखाली गाडले गेले

भारताने 1987 मध्ये दक्षिण गंगोत्री नावाचे केंद्र तेथे स्थापन केले. ते गेल्या काही वर्षांपूर्वी बर्फाखाली गाडले गेले. त्यानंतर 1988 मध्ये मैत्री व पुढे 2014 मध्ये भारती नावाचे केंद्र स्थापन झाले. हे डीआरडीओच्या साहाय्याने झाले. यातील मैत्री आणि भारती या केंद्रांवर भारतीय

शास्त्रज्ञांचा मुक्काम असतो. तेथून रशियाचा तळ जवळ असल्याने रशियन शास्त्रज्ञांशी चांगली मैत्री होते तसेच संशोधनात देवाण-घेवाण होते.

अंटार्क्टिकावर जाणे आणि सतत संशोधन करणे, हा विलक्षण अनुभव आहे. यंदा भारतीय शास्त्रज्ञांची 45 वी मोहीम आहे. त्याआधी आमचे गोवा राज्यात प्रशिक्षण झाले. यात शारीरिक, मानसिक तपासणी होते. त्यानंतर प्रत्येक शास्त्रज्ञ ज्या संस्थेतून आला आहे, तेथे त्याचे वेगळे प्रशिक्षण होते. त्यानंतरच टीम रवाना होते. यंदा आमची दिवाळी अंटार्क्टिकावरच आहे. तेथे आधी फक्त सॅटेलाइट फोन चालत होता. मात्र, अलीकडे व्हॉटसअ‍ॅप कॉल लागतो. त्यामुळे त्यावर संपर्क साधणे शक्य झाले आहे. आमची टीम 17 ऑक्टोबरला निघून डिसेंबरअखेरीस परत येईल.
रवींद्र मोरे, हवामानशास्त्रज्ञ, पुणे (टीम लिडर, अंटार्क्टिका मोहीम)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT