पुणे

पुणे : पाच रुपये वर्गणी मिळाली, तरी खूश व्हायचो: विरोधी पक्षनेते अजित पवार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हायस्कूलमध्ये असताना आम्ही मित्र एकत्र येऊन गणपती बसवायचो आणि शरद पवार साहेबांना भेटायला येणार्‍या कार्यकर्त्यांंकडून आम्ही एक एक रुपया वर्गणी गोळा करायचो, त्यात जरी कोणी आम्हाला पाच रुपये वर्गणी दिली, तरी आम्ही जाम खूश व्हायचो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शालेय जीवनातील गणेशोत्सवाच्या आठवणींना
उजाळा दिला. पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अजित पवार यांनी हजेरी लावून त्यांनी सहभाग घेतला. तसेच, मानाच्या काही प्रमुख गणपती बाप्पाचे दर्शनही त्यांनी घेतले.

या वेळी कसबा गणपतीला पुष्पहार घालण्यासाठी टिळक पुतळा येथे आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांशी व माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी औपचारिक संवाद साधत मनमोकळया गप्पा मारल्या.  या वेळी शालेय जीवनातील गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार म्हणाले, की आमच्या आज्जीच्या घरी गणपती बसवत असत.

तर, आम्ही मात्र हायस्कूलमधल्या मित्रांसोबत एकत्र येऊन गणपती बसवायचो, त्या वेळेस आम्ही साहेबांना भेटायला येणार्‍या कार्यकर्त्यांकडून वर्गणी गोळा करायचो, त्यांच्याकडून एक रुपया मिळाला, तरी त्या वेळेस ते आमच्यासाठी खूप असायचे, त्यात जर कोणी पाच रुपये दिले, तर विचारायची सोयच नाही. आम्ही जाम खूश व्हायचो. ते दिवसच वेगळे होते, असे सांगत अजित पवार यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

एक अशीही आठवण…
उपस्थित कार्यकर्त्यांंशी गप्पा- गोष्टी करताना अजितदादांनी खासदारकीच्या उमेदवारीचा गमतीदार किस्सा उपस्थितांना सांगितला. 1987 मध्ये मला खासदार करावे म्हणून काही कार्यकर्त्यांनी थेट पवार साहेबांकडे आग्रह धरला. त्यावर साहेबांनीही थेट नकार न देता, 'अजितला खासदार करा, मी गावी जाऊन शेती करतो,' असे या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी पुन्हा कधीच माझ्या उमेदवारीसाठी ब- काढला नाही. मात्र, 1991 मध्ये मला खासदार होण्याची संधी मिळाली. मात्र, मी दिल्लीत रमलो नाही, मी आपला महाराष्ट्रातच रमलो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT